

मुंबई : महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी अकरा लाखांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या कविता प्रतिक शिंदे या मोलकरणीला माटुंगा पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून सव्वादहा लाखांचे चोरीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तक्रारदार महिला ही महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस निरीक्षक तर तिचे पती रत्नागिरी येथील पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. ती सध्या तिच्या मुलीसोबत दादर येथील रेल्वे पोलीस वसाहतीत राहते. तिच्या आईने तिच्याकडे सुमारे अकरा लाखांचे सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी दिले होते. दागिने तिने कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते. जून 2025 रोजी तिने शेवटचे ते दागिने पाहिले होते.
तिच्याकडे कविता ही जानेवारी 2025 रोजी साफसफाईसाठी कामाला लागली होती. मात्र ती नोव्हेंबरमध्ये नोकरी सोडून गेली होती. लॉकरची चावी मिळत नसल्याने तिने शनिवारी तिच्या घरी चावी बनविणाऱ्या व्यक्तीला बोलावून त्याच्याकडून लॉकरची चावी बनवून घेतली. लॉकर उघडल्यानंतर तिला अकरा लाखांचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. या चोरीमागे कविताचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करुन तिने माटुंगा पोलिसांत तक्रार केली होती.
याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब घटुकडे, पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विनोद पाटील, पोलीस अंमलदार आनंद तांबे, महेश नेहारे, पंडित बंजारा, संभाजी बार्शी, योगेश नवले, प्रियांका रावरे यांनी तपास सरू केला होता. या पथकाने कविताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिने ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर तिच्याकडून पोलिसांनी सव्वादहा लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. तिला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.