

मुंबई : मुंबई महानगराची मुख्य जनवाहिनी असलेल्या बेस्ट बस सेवेच्या पुनरुज्जीवनाचा नऊ कलमी कार्यक्रम मुंबई काँग्रेसने तयार केला असून बेस्ट पूर्णपणे मुंबई महापालिकेच्या निधीतून चालवली जाईल, असा बेस्टचा जाहीरनामा काँग्रेसने तयार केला आहे. ‘बेस्ट वाचवा, मुंबई वाचवा.’ हा मुंबई काँग्रेसचा सत्तेवर आल्यावर प्राधान्यक्रम आहे, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
बेस्ट ही नफा कमावणारी संस्था नाही, तर सर्वसामान्यांची सावर्जनिक सेवा आहे. बेस्ट ही काँग्रेस सत्तेवर आल्यावर पूणर्पणे महापालिकेच्या निधीतून चालविली जाईल. बेस्टचा खर्च महापालिकेच्या अर्थसंकल्पातून केला जाईल. काही शुल्क वापरून निधी उभारण्यात येईल. सार्वजनिक सुनावणी आणि समितीच्या अहवालाशिवाय भाडेवाढ करता येणार नाही, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
बेस्टचे खासगीकरण थांबवणार असून बेस्ट पूर्णपणे सार्वजनिक केली जाईल. बेस्ट कामगारांचे शोषण थांबवले जाईल. वेट लिझ पद्धत बंद करण्यात येईल.
कॅगसारख्या संस्थेकडून बेस्टच्या कारभाराची तपासणी केली जाईल. बेस्टच्या प्रवासीसंख्येत घट का झाली? खर्च का वाढला ? याबाबत माहिती घेतली जाईल.
2019 च्या अहवालानुसार जादा बेस्ट बसेस पुन्हा सुरू करण्यात येतील, असे या बेस्टच्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. बेस्ट आणि महापालिका यांच्यातील कामगार करार अमलात आणला जाईल. डेपोच्या जागांचा वापर रिअल इस्टेटसाठी केला जाणार नाही,तर सार्वजनिक वापरासाठी करण्यात येईल.
कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी भरती करण्यात येईल. 2026 ते 2028 या काळात 3,000 नवीन बस खरेदी केल्या जातील. सार्वजनिक मालमत्तेचे खासगीकरण रोखण्यात येईल.
नवीन बसचे मार्ग सुरू करून त्यांचा आढावा घेतला जाईल. जे बस डेपो विकण्याबाबत निविदा काढल्या गेल्या, त्यांची चौकशी करू, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
मुंबई ःमहानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट बस पुनरुज्जीवन’चा नऊ कलमी कार्यक्रमाचा जाहीरनामा मुंबई काँग्रेसकडून रविवारी जाहीर करण्यात आला. यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड,प्रवक्ते सचिन सावंत आणि इतर पदाधिकारी.