अंधेरीत मजास डेपोच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटल्याने बस दुकानावर धडकली

बेस्‍ट बसचा अपघात
बेस्‍ट बसचा अपघात

जोगेश्वरी : पुढारी वृत्‍तसेवा अंधेरी पूर्वेला महाकाली गुंफा मार्गावर मजास डेपोची बस महाकाली येथून अंधेरी स्थानकाकडे जात होती. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या हनुमान मंदिराजवळ उतारावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्‍यामुळे बस एका दुकानावर जावून धडकली. यामध्ये दुकानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ही भाडेतत्वावरील मातेश्वरी कंपनीची बस आहे.

या मार्गावरील बस क्रमांक ३४ चा अपघात (रविवार) दुपारी झाला. उतारावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुकानावर धडकली. या घटनेत दुकानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये बस स्टॉपचे देखील मोठे नुकसान झालेले आहे.

घटना घडल्यावर स्थानिकांचा मोठा जमाव जमा झाला होता. तात्काळ एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी तात्काळ बस अपघातस्थळावरून बाजूला करत पोलिस स्टेशनला आणली. एमआयडीसी पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news