शरद पवारांची भर पावसात लग्‍न सोहळ्याला हजेरी; सोलापूरकरांना 'त्‍या' सभेची आठवण | पुढारी

शरद पवारांची भर पावसात लग्‍न सोहळ्याला हजेरी; सोलापूरकरांना 'त्‍या' सभेची आठवण

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यास भर पावसात हजेरी लावत वधू-वरास आशीर्वाद दिले. यावेळी शरद पवार समर्थकांनी एकच घोषणाबाजी केली. शरद पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, टाळ्या, शिट्ट्या वाजवून जल्लोषात पवारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पवारांनी हात उंचावून सर्व कार्यकर्त्यांना प्रतिसाद दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर त्यांनी तो राजीनामा पुन्हा मागे घेतला. राजीनाम्याच्या नाट्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले.

अन् पावसाने हजेरी लावली

पंढरपुरचा दौरा उरकून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भर पावसात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एन्ट्री झाली. लग्न सोहळ्यास उपस्थित राहून पवार यांनी वधू-वरास आशीर्वाद दिले. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा दिसून आला. काहीजण सेल्फी घेत होते, तर काहीजण घोषणाबाजी करीत होते. भर पावसात पवारांनी सोलापुरात एंट्री घेतल्यामुळे सातारा येथील सभेची आठवण सोलापूरकरांना झाली.

गुलाब पुष्पांची वृष्टी करत, ढोल- ताशांच्या गजरात पवारांचे स्वागत

राजीनाम्याच्या नाट्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आले. त्‍यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. पुणे नाका चौकात, मरीआई चौक या ठिकाणी खासदार पवारांचे फुले उधळून ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button