BEST Bus Andheri Accident: अंधेरीत बेस्‍टची धडकयात्रा; १४ वाहनांना धडक

कंत्राटी बसचे ब्रेक निकामी झाल्‍याने अपघात; आठ जण जखमी; ९ रिक्षा, ४ कारचे मोठे नुकसान
BEST Bus Andheri Accident:
BEST Bus Andheri Accident:Pudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबईत बेस्‍ट बसचे अपघात सत्र सुरूच असून शुक्रवारी अंधेरीत एका बेस्टच्या कंत्राटी बसने हाहाकार उडावला. बस क्र.२४२चे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटून बसने रस्त्यावरील एक दोन नव्‍हे, तर १४ वाहनांना जोरदार धडक दिली.

या गंभीर अपघातात ९ रिक्षा, ४ कार आणि एका तीनचाकी टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून सहा ते आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

BEST Bus Andheri Accident:
Pandharpur Wari: दोन हजारांहून अधिक पालख्या अन् दिंड्या विठुरायाच्या भेटीला!

मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली बेस्‍ट बससेवा कंत्राटदारांच्‍या हाती दिल्‍यानंतर ती मुंबईकरांची मृत्‍यूवाहिनी तर ठरत नाही ना? असा सवाल उपस्‍थित व्‍हावा अशी गंभीर अवस्‍था बेस्‍टची झाली आहे.

गेल्‍या दोन वर्षांत सातत्‍याने अपघात होत आहेत. अंधेरीत झालेला बेस्‍टचा हा अपघात अलीकडचा दुसरा अपघात आहे. तर दोन दिवसांपूर्वीच बुधवारी (८ जुलै) रोजी भांडुप येथे बसने पाच वाहनांसह पाच वाहनांना धडक दिली होती.

शुक्रवारी सव्वाचार वाजेच्‍या दरम्यान सांताक्रूझ आगारातून निघालेली मातेश्वरी या खासगी कंपनीची वेट लीज बस क्रमांक २४२ मिल्लत नगर ते अंधेरी बस स्थानक (पश्चिम) या मार्गावर सेवा देत होती. बसवर चालक म्‍हणून साहिल सावंत आणि वाहक किरण चव्हाण होते.

ही बस अंधेरी सबवेजवळ सीझर रोडवरून एस.व्ही.रोडवर उजवीकडे वळण घेत असताना बसचे ब्रेक निकामी झाल्‍याने चालक साहिल सावंत यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हिंदी सिनेमातील दृश्याप्रमाणे या बसने रस्त्यावरील जवळपास १४ वाहनांना एकामागून एक जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भयावह होती की अपघाताचा थरार पाहून अनेकांना धडकी भरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

BEST Bus Andheri Accident:
FDA Raid: राज्यभर एफडीएचा धडक कारवाईचा बडगा

या अपघातात ९ रिक्षा, ४ खासगी कार आणि एका तीन चाकी टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. तर सहा ते आठ जण जखमी झाले असल्‍याचे समजते. रात्री उशिरापर्यंत दोन जखमींची नावे समजली असून संतलाल यादव (३३) यांच्‍यावर कूपर रुग्‍णालयात तर साक्षी (३३) यांच्‍यावर मित्तल हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार सुरू आहेत. त्‍याची प्रकृती स्‍थीर आहे.

बसचालक साहिल सावंत (३०) आणि वाहक किरण चव्हाण (३५) यांना चौकशीसाठी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

अपघातानंतर वाहतूक कोंडी

या अपघातामुळे अंधेरीत या रस्‍त्‍यावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. वाहतूक कोंडीमुळे वाहनाचा वेग मंदावल्याने प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अखेर अपघातानंतर बस घटनास्थळावरून टोईंग करून अंधेरी पश्चिम बस स्थानकात नेण्यात आली.

४५ चालक निलंबित

बेस्ट बस अपघात प्रकरणात गेल्‍या पाच वर्षांत २०५ चालक दोषी आढळले. त्यापैकी ४५ चालकांना निलंबित करण्यात आले. तर वेट-लीजच्या कंत्राटी बसेसमध्ये ८ चालक बडतर्फे करण्यात आले आहेत.

अलीकडच्‍या बेस्‍ट अपघाताच्‍या काही माेठ्या घटना

८ जुलै २०२६ : बेस्‍टच्‍या (ए ४२५/३२) या एसी बसने भांडुप कोकणनगर येथे पादचार्‍यांसह पाच वाहनांना जोरदार धडक दिली.

१४ मे २०२६ : अंधेरी पश्‍चिम येथील एस. व्‍ही. रोडवरील चार बस एकमेकांवर आदळल्‍या. यामध्‍ये बस वाहकाचा मृत्‍यू झाला.

८ जून २०२६ : दादरमधील वर्दळीचे ठिकाण असलेल्‍या प्‍लाझा सिनेमाजवळ भरधाव बसने अनेक वाहनांना धडक दिली. यात एकाचा मृत्‍यू व सहा जण जखमी झाले होते.

४ जून २०२६ : मालाडच्‍या पुष्‍पा पार्क परिसरात बेस्‍ट बसने उभ्‍या कारला धडक दिली. यात कॅबचालकाचा मृत्‍यू झाला.

९ डिसेंबर २०२५ : कुर्लापश्चिमेकडील एस. जी. बर्वे मार्गावर बेस्टच्या ई-बसने (बस क्र. ए-३३२) अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना चिरडले होते. या भीषण अपघातात ९ ठार ४० जण जखमी झाले होते.

२९ डिसेंबर २०२५ : भांडुप स्‍टेशन येथील बस थांब्‍यावर उभ्‍या प्रवाशांना बसने चिरडले. यात चार जणांचा मृत्‍यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news