

स्वप्निल कुलकर्णी
मुंबई: अमृताहूनी गोड, विठ्ठलाची ओढ, पांडुरंग पांडुरंग बोलती अभंग॥
या अभंगाप्रमाणे ज्येष्ठ महिना आला की वारकऱ्यांना पंढरीच्या वारीचे वेध लागतात. ज्याप्रमाणे माहेरवाशिणीला श्रावणात माहेरची आठवण व्याकूळ करते, तसे पंढरीच्या भेटीसाठी वारकरी व्याकूळ होतात.
टाळ-मृदुंगाचा अखंड निनाद, भगव्या पताका हाती घेऊन, डोक्यावर तुळस, लाखो कंठातून घुमणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ चा जयघोषात महत्वाच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान झाले असून आषाढी एकादशी सोहळ्यासाठी दोन हजारांपेक्षा जास्त पालख्या व दिंड्या विठुरायाच्या भेटीला पंढरीला निघाल्या आहेत. त्यामुळे पंढरीच्या वाटेवर भक्तीचा मळा फुलल्याचे पाहायला मिळत आहे.
सात मानाच्या संतांच्या पालख्यांच्या प्रस्थानाने यावर्षी आषाढीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज या दोन पालखी सोहळ्यात १,२४५ दिंड्या आहेत.
उर्वरित पालखी सोहळ्यात मिळून ५०० च्या आसपास दिंड्या आहेत. यातील जास्त दिंड्या व पालखी सोहळे हे सातारा, पुणे, अहमदनगर, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील आहेत. राज्याबाहेरच शेजारच्या कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यातूनही शेकडो दिंड्या पंढरीला जात आहेत.
'जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया। अशा भावावस्थेत वारकऱ्यांची पावले पंढरीकडे पडू लागली आहेत. वारीतील वारकऱ्यांना जात नसते, धर्म नसतो. ते असतात फक्त विठ्ठलाचे निस्सीम भक्त.
वारीतील प्रत्येकाची प्रापंचिक सुख-दु:खे ही वैयक्तिक न राहता ती सर्वांची होतात. हातात टाळ घेऊन मृदंगाच्या तालावर नाचत, गर्जत, विठ्ठलनामाचा जयघोष करीत वारकरी ही पायी वाटचाल करतात. भजन गात, गर्जत, नाचत पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या या दिंड्या म्हणजे चैतन्याचा प्रवाह. या दिंड्याचे नुसते दर्शनही चित्त प्रसन्न करणारे असते.
संत साहित्याचे अभ्यासक
सात पालख्यांमध्ये सहभागी दिंड्या
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी : ८५०
श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू : ३९५
श्री संत एकनाथ महाराज संस्थान, पैठण : ५०
संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर : ६५
श्री संत मुक्ताई देवस्थान, मुक्ताईनगर : २५
श्री विठ्ठल रखुमाई संस्थान, कौंडण्यपूर : ३५
श्री संत निळोबाराय संस्थान, पिंपळनेर : ७१
आपल्या संतमंडळींनी जनसामान्यांमध्ये समतेचे मूल्य रुजवले. सारे समाजघटक वारीच्या सूत्राने जोडले. अशा सगळ्यांच्या सहभागानेच वारकरी संप्रदाय उभा राहिला. ‘
- डॉ. सदानंद मोरे,