Maharashtra ST Corporation : एसटीत 'डबल कंट्रोल'चा फॉर्म्युला?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अधिकारांवर लवकरच अंकुश
Pratap Sarnaik
Pratap SarnaikPudhari
Published on
Updated on

मुंबई : महायुती सरकारमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढत्या प्रभावावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपाकडून पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या सरनाईक यांच्या कारभारावर समांतर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक वर्षांपासून रिक्त असलेले उपाध्यक्षपद पुन्हा कार्यान्वित करण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पदासाठी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविला असल्याचे समजते. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, परिवहन मंत्री सरनाईक सध्या परदेश दौऱ्यावर असतानाच या हालचाली वेगाने सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Pratap Sarnaik
BJP protest Mumbai : काँग्रेसविरोधात भाजपचे टिळक भवनासमोर धरणे आंदोलन

एसटी महामंडळात १९९२ ते १९९६ या कालावधीत शिवसेनेचे चंद्रकांत वैद्य यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर हे पद दीर्घकाळ रिक्त राहिले. आता तब्बल तीन दशकांनंतर हे पद पुन्हा भरले जाणार असल्याने त्यामागील राजकीय गणितांची चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रांच्या मते, एसटीमध्ये अलीकडील काळात सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि वाढलेल्या जनसंपर्कामुळे त्यांची आणि शिंदे गटाची स्वतंत्र राजकीय प्रतिमा निर्माण होत आहे. या कामगिरीचे संपूर्ण राजकीय श्रेय एका घटक पक्षाकडे जाऊ नये, तसेच महामंडळातील निर्णय प्रक्रियेत भाजपाचाही प्रभाव कायम राहावा, यासाठी उपाध्यक्षपदाचा पर्याय पुढे आणल्याची चर्चा आहे.

Pratap Sarnaik
Congress protest Mumbai : काँग्रेसचा भाजपा कार्यालयावर मोर्चाचा प्रयत्न

दरम्यान, या हालचालींमुळे महायुतीतील अंतर्गत सत्तासंतुलनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपाध्यक्षपदाची नियुक्ती प्रत्यक्षात झाल्यास एसटी महामंडळात 'डबल कंट्रोल'ची नवी व्यवस्था निर्माण होणार का, तसेच परिवहन मंत्र्यांच्या अधिकारांवर त्याचा कितपत परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news