

Additional CET For BBA BCA
मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आलेल्या निर्णयानतंर आता सीईटी सेलकडून राज्यातील बीबीए, बीसीए, बीएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आणखी एक सीईटी घेतली जाणार आहे. या सीईटीची नोंदणी सुरु केली असून येत्या 20 जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
बीबीए, बीसीए आणि बीएमएस अभ्यासक्रमांसाठी यंदाही एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध असून, 29 व 30 एप्रिल रोजी झालेल्या सीईटी परीक्षेसाठी 72 हजार 259 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात फक्त 61 हजार 666 विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थिती लावली होती. पहिल्याच परीक्षेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने पर्यायी उपाययोजना आवश्यक होती. परंतु, आता पुन्हा ऐन प्रवेशाच्या धामधुमीत आणखी एक सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा आधीच्या परीक्षेप्रमाणेच ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी एप्रिलमध्ये झालेली परीक्षा दिली होती तेही या अतिरिक्त परीक्षेस बसू शकणार आहेत मात्र त्यांच्यासाठी दोन्ही परीक्षांमधून त्यांची ज्या परीक्षेत जास्त गुण असेल ती गुणपत्रिका ग्राह्य धरली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांचे मार्क्स ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करावे लागणार आहे.
नोंदणीनंतर अतिरिक्त सीईटीची अंतिम परीक्षा तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. अभ्यासक्रम व माहिती पुस्तिका अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर भेट देत माहिती तपासावी, असे आवाहन सीईटी कक्षाद्वारे करण्यात आली आहे.
प्रवेश परीक्षा कक्षामार्फत 29 व 30 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या 72 हजार 259 उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 61 हजार 666 उमेदवार परीक्षेला हजर राहिले, म्हणजेच तब्बल 10,593 उमेदवार गैरहजर राहिले होते. या विद्यार्थ्यांना ही ‘अतिरिक्त संधी’ मिळणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्या असतील, त्यांच्या दोन्ही गुणपत्रिकांतील सर्वाधिक स्कोअर संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाईल. यासाठी विद्यार्थ्यांनी संगणकीय प्रणालीवर दोन्ही गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक राहील.
काही विद्यार्थ्यांनी मूळ परीक्षा दिली असली तरी त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा व्हावी या हेतूने ते अतिरिक्त सीईटीला बसू इच्छितात. अशा विद्यार्थ्यांनाहीही संधी उपलब्ध करून देण्यात येणार.