Maharashtra Education News | अभियांत्रिकीच्या प्रवेशात आता तीनऐवजी चार ‘कॅप’ फेर्या
Maharashtra Education Update
मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आता तीनऐवजी चार प्रवेश फेर्या राबविण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून या नव्या नियमालवलीची अमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रवेशासाठी महाविद्यालय पसंतीमध्येही यंदा बदल केला जाणार असून पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या फेरीत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांची प्रवेशासाठी दिलेली प्राधान्यक्रम अनुक्रमे एक, तीन आणि सहा महाविद्यालय, अशी असणार आहे. याबरोबरच व्यवस्थापन कोट्यातून भरणार्या जागांचे अर्ज सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होणार असून या कोट्यातील होणारे प्रवेशही संस्थांना मेरीटनुसारच भरावे लागणार आहेत.
दहावीनंतरचा पॉलिटेक्निक (अभियांत्रिकी पदविका) अभ्यासक्रम, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशात बदल केल्यानंतर आता अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतही बदल करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.
अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या आतापर्यंत तीन फेर्या राबविल्या जात होत्या. मात्र शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून या अभ्यासक्रमांच्या चार फेर्या राबविण्यात येणार आहेत. तसेच दुसर्या, तिसर्या व चौथ्या फेरीसाठी पात्र असलेल्या उमेदवाराने भरलेला पर्याय अर्जामध्ये बदल करण्याची सुविधा मिळणार आहे. मागील फेर्यांमध्ये पर्याय अर्ज भरण्यात अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांना या चौथ्या फेरीमध्ये पर्याय अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
कॅप फेर्यांची संख्या वाढवून आता चौथी कॅप फेरी समाविष्ट करण्यात आली आहे. यापूर्वी तीन फेर्यांनंतर प्रवेश प्रक्रिया संपुष्टात येत होती. आता चौथ्या फेरीअंती प्रवेश अंतिम करण्यात येणार असून, दुसर्या फेरीनंतर अभ्यासक्रमांचा प्रवेश अंतिम ठरणार आहे. आतापर्यंतच्या मर्यादित फेर्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांना खासगी किंवा व्यवस्थापन कोट्यातील महागड्या प्रवेशांचा पर्याय स्वीकारावा लागत होता. चौथ्या फेरीमुळे विद्यार्थ्यांना सीएपी प्रक्रियेद्वारे अधिक संधी उपलब्ध होतील, असे मंत्री पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

