

मुंबई : वांद्रे पुनर्विकास प्रकल्पात वसुली प्रकरण उघडकीस आल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या प्रकरणात नाव आलेल्या सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना तातडीने एक महिना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
महेश पाटील यांच्यावर वांद्रा येथील हाऊसिंग पुनर्विकास प्रकल्पात अनेक आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांना तसेच काही मनपा अधिकाऱ्यांनाही आकर्षक रकमेच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून 20 ते 50 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप समोर आला आहे.
मूळ भारतीय असलेले ब्रिटिश नागरिक निशित पटेल यांनी महेश पाटील यांच्यावर वरील गंभीर आरोप केले असून त्यांनी यासंदर्भात मुंबई पोलिस आयुक्त, डीजीपी आणि मुख्यमंत्री यांना लिखित तक्रार दिली आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या संपत्ती प्रकोष्ठाकडून सुरू आहे. पाटील यांनी काही बाऊंसरांसह पटेल यांना कार्यालयात बंद करून ठेवले, त्यांना मारहाण केली, तसेच बंदुकीच्या धाकावर जीव घेण्याची धमकी देऊन 60 कोटी रुपये मागितले असा आरोप पटेल यांनी केला आहे.
याप्रकरणी पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत महेश पाटील यांच्या विरोधात मनपात कोणतीही औपचारिक तक्रार नोंदवलेली नाही. मात्र, त्यांच्या पदावर राहण्याने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहील का, याबाबत शंका निर्माण होत असल्याने खबरदारी म्हणून त्यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
तपासानंतर पुढील कारवाई
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून महेश पाटील यांच्यावरील आरोपांची सत्यता तपासल्यानंतर पुढील प्रशासकीय व कायदेशीर निर्णय घेतले जाणार आहेत. मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेल्या गंभीर आरोपांनी प्रशासनात आणि स्थानिक राजकारणात मोठ्या चर्चेला तोंड फुटले आहे.
याबाबत दैनिक पुढारीने ‘80 कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याने बीएमसी हादरली‘ असे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध केले. यानंतर महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. महापालिक आयुक्तांनी तातडीने महेश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.