

घाटकोपर : घाटकोपरच्या असल्फा विभागात घरात एकटी असलेल्या एका जेष्ठ महिलेची हत्त्या झाल्याने खळबळ उडाली आहे. शहनाज अनिस काझी (वय 65) असे या मयत महिलेचे नाव आहे.मात्र ही हत्या तिच्या सावत्र सुनेनेच लुटीच्या उद्देशाने आणि प्रॉपर्टीच्या वादातून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सावत्र सून मुमताज इरफान खान(वय 50) ला घाटकोपर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. शहनाज यांच्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या पहिल्या पतीची ती सून आहे.
शहनाज ही जेष्ठ महिला त्यांच्या पतीच्या निधनानंतर एकट्याच हिमालया सोसायटीमध्ये राहत होती.त्यांच्या पतीच्या पहिल्या पत्नीला तिच्या आधीच्या पतीकडून चार मुले आहेत तर या पतीकडून तीन मुले आहेत. शहनाज यांना मात्र मुलबाळ नव्हते. मात्र गेल्या काही वर्षात शहनाज यांच्या संपत्तीच्या वाटणीवरून सात मुलांमध्ये वाद सुरु होते.
यात मुमताजचे पती हयात नसल्याने आपल्याला या संपत्तीमधील हिस्सा मिळेल की नाही अशी घालमेल तिच्या मनात होती. त्यातच तिला पैशाची निकड भासली. त्यामुळे आपण एकट्या असलेल्या शहनाज यांची हत्या केल्यास संपत्तीमध्ये हिस्साही मिळेल आणि तिच्या अंगावरील दागिनेही मिळतील म्हणून तिने 25 रोजी बुरखा घालून शहनाज यांच्या घरात प्रवेश केला.
यावेळी जड वस्तूने त्यांच्या डोक्यात आघात करून हत्या केली. यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेऊन तिथून तिने पळ काढला. आपली बहीण फोन उचलत नाही म्हणून त्यांच्या बहिणीने इमारतीमधील रहिवाश्यांना फोन करून पाहण्यास सांगितले असता त्यांची हत्या झाल्याचे समोर आले.
कुर्ला येथून सुनेला घेतले ताब्यात
याबाबत घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी दहा वेगवेगळी पथके या आरोपीच्या शोधात लावली. याशिवाय दीडशेपेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासले गेले. अखेर एक बुरखा घातलेली महिला पोलिसांना या प्रकरणी आढळून आली. तिचा तपास केला असता ती मुमताज असल्याचे पोलिसांना समजले.
पोलिसांनी कुर्ला येथून मुमताजला ताब्यात घेतले आणि तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलीस पुढील तपास करीत आहेत.