

मुंबई : औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. या मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करत नैसर्गिक रंगांचा वापर करून त्याचे संवर्धन करण्यात यावे. तलाव आणि मंदिर परिसरात वापरले जाणारे दगड आणि इतर साहित्य त्याचप्रमाणे एकूणच सर्व कामे दर्जेदार असावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्री. क्षेत्र औंढा नागनाथ तसेच नागपूर येथील कल्याणेश्वर मंदिराच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. तसेच पुण्याजवळ आंबेगाव येथील शिवसृष्टी थीम पार्कच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार संतोष बांगर, प्रवीण दटके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
औंढा नागनाथ मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार असून यामध्ये मंदिराच्या आवारातील नंदी मंडप, ओवरी आणि दर्शन बारी या मंदिराच्या आवारातील वास्तूंचे संवर्धन केले जाणार आहे. यासह हरिहर तलाव आणि परिसरातील मंदिरांचे संवर्धन आणि जीर्णोद्धार केला जाणार आहे.
मंदिर परिसरासाठी बाह्य विद्युतीकरण, सीसीटीव्ही, रोषणाई आणि उद्यान विकास देखील केला जाणार आहे. भक्त निवासाची नव्याने उभारणी केली जाणार असून २५०० क्षमतेचा प्रतीक्षा कक्ष असणार आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, यादृष्टीने याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे दिली.
कल्याणेश्वर मंदिर परिसरात पार्किंगची व्यवस्था वाढवावी
नागपूर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा आढावा घेताना आवश्यकता विचारात घेऊन पार्किंगची व्यवस्था वाढविण्यात यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
तथापि, अशा परिसरात यांत्रिक पार्किंगचा वापर व्यवहार्य ठरत नसल्याने साध्या पार्किंगची व्यवस्था असावी, असे ते म्हणाले. नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी यापूर्वी शिखर समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनुसार मंदिर विकास आराखड्यात करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली.
आंबेगावच्या नियोजित शिवसृष्टीचा आढावा
बैठकीत औंढा नागनाथ मंदिराच्या १९३ कोटी ५५ लाख २० हजार ४७४ कोटींच्या तर, कल्याणेश्वर मंदिराच्या ७२.४९ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास करताना मंदिराचे वैभव जपण्याचे निर्देश दिले, तर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जतन आणि संवर्धनाबरोबरच भाविकांसाठी चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याची सूचना केली.