मुंबई : विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Assembly election 2024) दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या अखेरीस घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे; परंतु महायुतीच्या अर्थसंकल्पातील लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यांवर जावे, त्याचे निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांचे पैसे महिलांना मिळावेत, यासाठी महायुती सरकारचे प्रयत्न सुरू आहे.
या योजनांमुळे महायुती सरकारसाठी अनुकूल वातावरण बनत असल्याचे महायुतीच्या नेत्यांना वाटत आहे. या योजनेचा विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा हवा असेल तर कमीत कमी तीन महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यात पडले पाहिजेत. रक्षाबंधन, नवरात्री आणि भाऊबीज असे तीन सण महिलांसाठी महत्त्वाचे आहेत. ते तिन्ही सण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होत आहेत. त्यामुळे ऑक्टोबरऐवजी नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या, तर महायुतीला फायदा होऊ शकतो, असे महायुतीच्या नेत्यांना वाटत आहे.