नवी दिल्ली: आगामी काळात महाराष्ट्रसह हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये संघटनात्मक फेरबदल होणार असल्याच्या चर्चा होत्या. यामध्ये महाराष्ट्रातही काही अंशी संघटनात्मक फेरबदल होण्याच्या चर्चा होत्या. मात्र काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये कुठल्याही प्रकारचे संघटनात्मक बदल होणार नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणूक लढवली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उत्तम कामगिरी केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला. (Maharashtra Congress)
मंगळवारी दिल्लीत काँग्रेसची सर्व सरचिटणीस, प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. मात्र प्रभारी रमेश चेन्नीथला अनुपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असे प्रमुख नेते राज्याचा दौरा करत आहेत. दिल्लीत झालेली काँग्रेसची बैठक आणि महाराष्ट्रात काँग्रेसचा दौरा एकाच दिवशी आल्याने पूर्व सूचना देऊन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आजच्या बैठकीला अनुपस्थित होते. (Maharashtra Congress)
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, जमाती मधील उपवर्गीकरणास मान्यता दिली. यासंदर्भातही आज काँग्रेस पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेस पक्षातील नेत्यांचे अनेक मुद्द्यांवर एकमत असले तरी या मुद्द्यावर मात्र एकमत नसल्याचे समजते. पक्षातील काही प्रमुख नेत्यांना वाटते की हे उपवर्गीकरण झाले पाहिजे ज्यामुळे अनुसूचित जाती, जमाती मधील इतर जातींना फायदा होईल तर काही नेत्यांना वाटते की उपवर्गीकरण केल्यामुळे नुकसान होईल. त्यामुळे एकीकडे बऱ्याच मुद्द्यांवर मते सारखी असली तरी अनुसूचित जाती, जमाती मधील उपवर्गीकरणावर मात्र वेगवेगळी मते असल्याचे समजते. (Maharashtra Congress)