

मुंबई : माजी मंत्री नवाब मलिक यांना आपला विरोध कायम असून भाजप त्यांचा प्रचार करणार नसल्याची स्पष्ट भूमिका भाजप नेते आशिष शेलार यांनी जाहीर केली आहे. त्याचवेळी मलिकांच्या कन्या सना मलिक यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही. त्यामुळे महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार या धोरणानुसार त्यांच्यासाठी काम करण्याची तयारीही भाजपने दाखविली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपचा विरोध डावलत शिवाजी नगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघात नवाब नलिकांना उमेदवारी दिली. तर, त्यांची कन्या सना यांना अणुशक्तीनगरची उमेदवारी दिली. यानंतर नवाब मलिकांना विरोध करणाऱ्या भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात होता. या पार्श्वभूमीवर, भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
शेलार म्हणाले की, भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही.
दरम्यान, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून देण्यात आलेल्या महायुतीच्या उमेदवारीबाबत विचारले असता आशिष शेलार म्हणाले, यासंदर्भातील कोणताही पुरावा किंवा माहिती समोर येत नाही, तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे, याबाबत दुसरा प्रश्न उपस्थितच होत नाही.