Maharashtra assembly election 2024 : नाशिक मध्यसाठी 'सांगली पॅटर्न'?

ठाकरे गटाच्या उमेदवारीने काँग्रेसमध्ये नाराजी
Maharashtra Assembly election 2024
विधानसभा निवडणूक Maharashtra Legislative Assembly
Published on
Updated on

नाशिक : महाविकास आघाडीतील जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या नाशिक मध्य मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने कब्जा मिळवत वसंत गिते यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या डॉ. हेमलता पाटील यांनी बंडाचा झेंडा उभारला असून, मैत्रीपूर्ण लढतीचा 'सांगली पॅटर्न' राबविण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील ठाकरे गटाची उमेदवारी महाविकास आघाडीचा अधिकृत निर्णय नसल्याचे सांगत 'वेट ॲण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे.

महाविकास आघाडीत चांदवड, इगतपुरी, मालेगाव मध्यसह नाशिक मध्य मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. गत विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातून डॉ. हेमलता पाटील यांना एेनवेळी उमेदवारी देण्यात आली होती. प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळू न शकल्याने डॉ. पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यंदा या निवडणुकीसाठी डॉ. पाटील यांनी सुरुवातीपासूनच तयारी केली होती. शिवसेना ठाकरे गटानेही नाशिक मध्य मतदारसंघावर दावा केला होता. त्यामुळे या मतदारसंघावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. बुधवारी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच ठाकरे गटाने या मतदारसंघातून माजी आमदार वसंत गिते यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. नाशिक शहरातील चारपैकी एकमेव असलेली जागाही गेल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. डॉ. पाटील यांनी तर या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार व्यक्त करत मैत्रीपूर्ण लढतीचा सांगली पॅटर्न राबविण्याची मागणी केली आहे.

नाशिक मध्यसाठी यावेळी मी उमेदवारी करण्यासाठी उत्सुक होते. मला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची खात्री होती. आता जी माहिती हाती आलेली आहे त्यानुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाने ही जागा ठाकरे गटाला सोडली आहे. ही जागा लढविण्यावर मी ठाम असून, मैत्रीपूर्ण लढत किंवा अपक्ष म्हणून मी माझी उमेदवारी कायम ठेवणार आहे.

डॉ. हेमलता पाटील, प्रवक्त्या, काँग्रेस, नाशिक.

महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटपाची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे नाशिक मध्यची जागा काँग्रेसच्याच वाट्याला येईल, अशी खात्री आहे. ठाकरे गटाला ही जागा सुटल्यास स्थानिक पदाधिकारी, इच्छुक तसेच पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

आकाश छाजेड, शहराध्यक्ष, काँग्रेस, नाशिक.

उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिली आहे. आघाडीतल्या सगळ्यांची भेट घेऊन नाराजी दूर केली जाईल. सर्व जण आघाडीचा धर्म पाळून काम करतील, अशी अपेक्षा आहे.

वसंत गिते, माजी आमदार, नाशिक मध्य, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news