

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी सोमवारी 12 मतदारसंघांतून 80 उमेदवारांनी 105 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये माजी मंत्री शंकरराव यशवंतराव गडाख, माजी मंत्री आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे, आमदार रोहित राजेंद्र पवार, माजी आमदार विजयराव भास्करराव औटी, बाळासाहेब दामोधर मुरकुटे, प्रभावती जनार्धन घोगरे, प्रतिभा बबनराव पाचपुते, अनुराधा राजेंद्र नागवडे, विक्रम बबनराव पाचपुते, अंबादास पिसाळ, सुनिता शंकरराव गडाख या दिग्गजांचा समावेश आहे. आतापर्यंत 130 उमेदवारांचे 174 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार शेवटचा दिवस आहे.
माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच मतदारसंघातून त्यांची पत्नी सुनीता गडाख यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. याच मतदारसंघातून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांनी पक्षाचा अ व ब फॉर्म दाखल केलेला नाही. राहुरी मतदारसंघातून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने अर्ज भरला आहे. याच मतदारसंघातून अक्षय रावसाहेब तनपुरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
कर्जत -जामखेड मतदारसंघातून आमदार रोहित राजेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच मतदारसंघातून अंबादास पिसाळ यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. शिर्डी मतदारसंघातून माजी आमदार स्व. चंद्रभान घोगरे यांच्या स्नुषा प्रभावती जनार्धन घोगरे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी पारनेर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपच्या वतीने आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांनी अर्ज दाखल केला आहे. याच मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांनी देखील भाजपच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. याच मतदारसंघातून माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या स्नुषा अनुराधा राजेंद्र नागवडे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने अर्ज सादर केला आहे.
श्रीरामपूर मतदारसंघातून हेमंत ओगले यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. शेवगाव मतदारसंघातून भाजपचे गोकुळ विष्णू दौंड यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अॅड. विद्याधर जगन्नाथ काकडे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. संगमनेर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अब्ुल अजीज अहमद शरीफ बोहरा यांनी अर्ज दाखल केला आहे. अकोले (अ.ज.) मतदारसंघातून मधुकर तळपाडे यांनी अर्ज दाखल केला आहे. आमदार आशुतोष काळे, माजी आमदार वैभव पिचड यांनी अनुक्रमे कोपरगाव व अकोले मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत.