

मुंबई : आसनगाव - कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या प्रकल्पांतर्गत, कसारा यार्डमध्ये ओव्हरहेड उपकरणांच्या जोडणीसाठी मध्य रेल्वेकडून शुक्रवार/ शनिवार आणि रविवार रात्री विशेष 'ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक' घेण्यात येणार आहे.
हा विशेष ब्लॉक ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी आणि ३१ आणि १ नोव्हेंबर मध्यरात्री ३ ते पहाटे ५:३० वाजेपर्यंत (२ तास ३० मिनिटे) उंबरमाळी आणि कसारा दरम्यानच्या मेन लाईनवर असणार आहे. यामुळे खर्डी आणि कसारा दरम्यानच्या 'अप' आणि 'डाउन' मेन लाईनवरील मेल/एक्सप्रेस गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.
‘या’ गाड्यांना होणार उशिर
दानापुर – एलटीटी, बल्लारशाह नंदीग्राम एक्सप्रेस, रक्सौल कर्मभूमी एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, एर्नाकुलम एक्सप्रेस, पंजाब मेल एक्सप्रेस या सह इतर एक्सप्रेस गाड्यांना विलंब होणार आहे.
उपनगरीय रेल्वेवर होणारा परिणाम
कसारा येथून मध्यरात्री ३:५१ आणि पहाटे ४:५९ वाजता सुटणाऱ्या आणि अनुक्रमे ६:३० व ७:३८ वाजता सीएसएमटी येथे पोहोचणाऱ्या लोकल कसारा आणि कल्याण दरम्यान तिसऱ्या मार्गावरून चालवण्यात येतील. या गाड्या उंबरमाळी आणि खर्डी स्थानकांवर थांबणार नाहीत.