

न्हावरे: आंबळे (ता. शिरूर) येथे शिरूर -चौफूला रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत रात्री किर्तन ऐकून आपल्या घराकडे निघालेल्या चौघांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पायी चाललेल्या जेष्ठ महिलेसह दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या अपघातात कौशल्या वसंत झेंडे (वय ६१), सोहम राजीव झेंडे (वय १३) आणि आरुषी दत्तात्रय झेंडे (वय ११) यांचा मृत्यू झाला आहे, तर ज्योती राजीव झेंडे (वय ४२) या गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण एकाच कुटुंबातील आंबळे (ता. शिरूर) येथील आहे.
या घटनेबाबत मयताचे नातेवाईक संतोष अनिल झेंडे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आंबळे गावातील अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर झेंडे कुटुंबातील कौशल्या झेंडे, सोहम झेंडे, आरुषी झेंडे, ज्योती झेंडे, तसेच इतरही ग्रामस्थ गुरुवारी (दि. २९) रात्री उशीरा आपल्या वस्तीकडे पायी जात होते.
या दरम्यान केसरी हॉटेलसमोर न्हावरे बाजूकडून आलेल्या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेने पायी चाललेल्या या चौघा पादचाऱ्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की चौघेही रस्त्यावर फेकले गेले.
या अपघातात सोहम आणि आरुषी यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला तर ज्योती आणि कौशल्या झेंडे यांना शिरूर येथील खासगी रुग्णालयात नातेवाईकांनी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान कौशल्या झेंडे यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला, तर ज्योती झेंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर अज्ञात वाहन चालक न थांबता शिरूर बाजूने तसाच निघून गेला. एकाच कुटुंबातील ज्येष्ठासह दोन चिमुकल्यांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण आंबळे गावावर शोककळा पसरली.
मोठ्या शोकाकुल वातावरणात आंबळे येथील स्मशानभूमीत तिघांवर शुक्रवारी (दि. ३०) अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर शेळके हे करत आहे.