

नालासोपारा : विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील एका बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या बहिणीचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या तिन्ही भावंडांची लग्न झाली नव्हती त्यामुळे एकाच घरात राहत होती. या तिघांनीही चार दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचे सांगितले जात असून गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. कुमार मनसुखलाल मेहता (५०), दिपेश मनसुखलाल मेहता (५२) आणि खेवणा मनसुखलाल मेहता (४८) अशी मृतांची नावे आहेत.
तिघांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, आर्थिक विवंचना तसेच आजारपणांना कंटाळून भावंडांनी हे टाेकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.
विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी येथील के-३-डी, गार्डन ॲव्हेन्यू या इमारतीच्या डी विंगमधील एका फ्लॅटमधून प्रचंड दुर्गंधी येत होती. इमारतीतील रहिवाशांनी सचिवांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बोळींज पोलिसांना कळविण्यात आले.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फ्लॅटची पाहणी केली असता तिघांचे मृतदेह आढळून आले. मृत तिघेही सख्खे भाऊ-बहीण असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एक जण कर्करोगाने ग्रस्त होता, तर एक पक्षघाताने आणि कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या परिस्थितीतून तिघांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
फॉरेन्सिककडून घटनास्थळाची पाहणी
फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या घटनेमागील परिस्थितीचा तपास बोळींज पोलीस करत आहेत.
इमारतीत एका वर्षाच्या कालावधीत तिसरी घटना
दरम्यान, या इमारतीत एका वर्षाच्या कालावधीत आत्महत्येची ही तिसरी घटना असल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी एका माजी लष्करी अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यापूर्वी दहावीच्या एका विद्यार्थ्याने इमारतीच्या १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. इमारतीत वारंवार घडणाऱ्या आत्महत्येच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातवरण आहे.