

मुंबई : मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून गृहविभागाने मुंबई शहरात आणखी चार पोलीस ठाण्यांना मान्यता दिली आहे. त्याचबरोबर तीन सहायक पोलीस आयुक्त आणि दोन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती होणार आहे. त्यासाठी 1,448 नवीन पदे निर्माण केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पोलीस ठाण्यांच्या वाढीची मागणी होत होती. त्यानुसार चार पोलीस ठाण्यांची भर पडणार आहे. भांडुप आणि कांजूरमार्ग येथील असलेली लोकसंख्या, महामार्ग असल्याने होणारे अपघात, किरकोळ वाद, खटले आणि अन्य गुन्ह्यांचा आलेख पाहता आता महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे, वाकोला आणि निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या काही भागाची विभागणी करून तिथे गोळीबार नगर पोलीस ठाणे, घाटकोपर व मालवणी पोलिसांचा विस्तार पाहता तिथे मढ मार्वे आणि असल्फा पोलीस ठाण्यांना मान्यता देण्यात आली आहे. या चारही पोलीस ठाण्यांसाठी 1 हजार 448 नवीन पदे निर्माण केली जाणार आहे. त्यात पोलीस निरीक्षक ते पोलीस शिपाई आदी पदांचा समावेश असेल. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वच्छतेसाठी आऊटसोर्सिंग केले जाणार आहे. त्यासठी एकूण 124 कोटी 24 लाख आवर्ती खर्च असणार आहे.