

विश्वकुमार धुरी
मुंबई : करी रोड (पश्चिम) परिसरातील स्वातंत्र्य सैनिक सखाराम बाळाजी पवार मार्गावर मुंबई महापालिकेने 3 नोव्हेंबरपासून रस्ता उखडून ठेवला आहे. मात्र गेल्या बारा दिवसांपासून काँक्रीटीकरणाचे काम पूर्णपणे ठप्प आहे. रस्त्याच्या मध्यभागी मातीचे ढिगारे, उघडे खंदक, तुटलेले बॅरिकेड आणि साचलेली घाण यामुळे धूळ, डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच रुग्णवाहिकाही आतमध्ये पोहोचू न शकत नसल्याने परिस्थिती धोकादायक ठरत आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विशाल भोईर यांनी उपस्थित केला आहे.
या परिसरातील 12 इमारतींमध्ये सुमारे 1400 कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. तसेच लोअर परेल-करी रोड भागात अनेक कंपन्या असल्यामुळे येथील हजारो कर्मचार्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा विचार न करता काम अर्धवट सोडल्याने नागरिकांच्या संतापाला उधाण आले आहे. योजनेशिवाय, सुरक्षा उपायांशिवाय आणि कोणताही पर्यायी आराखडा न देता एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्ता उखडून प्रशासन काय सिद्ध करू पाहत आहे? असा थेट प्रश्न येथील साफल्य इमारतीतील रहिवासी प्रथमेश नेवरेकर यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने तातडीने हस्तक्षेप करून काम सुरू करावे किंवा रस्ता सुरळीत करावा. अन्यथा येथील हजारो नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.