

Mango Traders loss
नवी मुंबई : मुंबई एपीएमसीतील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात अतिनुकसानकारक ठरला. मे महिन्यांत झालेला अवकाळी पाऊस, हवामानातील बदल, वाढत्या तापमानामुळे हापूसचा माल लवकर तयार झाला. तो वेळेवर तोडता आला नाही.त्यामुळे हापूसचा दर्जा खालावला.मे महिन्यात पावसामुळे हापूस साके होऊन गळून पडल्याने एपीएमसीतील हापूसचा हंगाम व्यापार्यांच्या हातातून गेला. यामुळे व्यापार्यांना तब्बल 125 कोटींच्या नुकसानाचा फटका बसला आहे. अशी माहिती घाऊक फळ व्यापारी आणि संचालक संजय पानसरे यांनी दै.पुढारीशी बोलताना दिली.
या घटनाक्रमामुळे यंदा केवळ एप्रिल महिन्यात हापूसचा चांगला हंगाम झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्के उत्पादन कमी झाले. आणि जे उत्पादन शेतकर्यांच्या आणि व्यापार्यांच्या हातात आले तेही कडक उन्हाने 30 टक्के वाया गेले. यामुळे याचा थेट परिणाम उलाढालीवर झाला असून यंदाच्या हंगामात 35 टक्के उलाढाल कमी झाली. यामुळे हा हंगाम व्यापार्यांच्या हातातून गेल्याची माहिती घाऊक फळ व्यापारी आणि संचालक संजय पानसरे यांनी दै.पुढारीशी बोलताना दिली. हापूस आंबा बगायतदारांना व्यापारी आगाऊ पैसे देतात.त्यातील 30 टक्के रक्कम बागायत शेतकर्यांकडे अडकली आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, राजापूर, रत्नागिरी, पुणे (जुन्नर), रायगड आणि गुजरातमधील हापूस आंबा साके झाल्याने मे महिन्यात मोठ्या प्रमाणात गळून पडला. तर मे महिन्यात विक्री केलेला 70 टक्के माल खराब निघाल्याने किरकोळ व्यापार्यांकडून मालाची वसुली करताना घाऊक व्यापार्यांना उधारीवर दिलेल्या मालाची रक्कम वसूल करताना त्रास सहन करावा लागणार आहे.
मे महिन्यात सर्व प्रकारच्या हापूसची 80 ते 90 हजार पेट्यांची आवक एपीएमसीत होते. ती यावेळी केवळ 25 हजार पेट्यांची झाली. म्हणजेच 55 हजार पेट्यांची आवक घटली. हे नुकसान भरुन काढण्यासाठी आता पाच वर्षांचा कालावधी व्यापार्यांना लागणार आहे.
विशेष म्हणजे या पावसाचा आणि आवक घटल्याचा फटका निर्यातदारांनाही बसला आहे. नुकसानीचा हा आकडा सुमारे 200 ते 250 कोटींचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे एकूणच एपीएमसीतील हापूस आंबा व्यापार्यांना 125 कोटींच्या नुकसानाचा फटका यंदा सहन करावा लागणार आहे.