

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई महानगरात सोमवारी पहाटेपासून तुफान कोसळलेल्या पहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली. यामुळे मुंबई महापालिकेने केलेल्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल झाली. यंदा मुंबई तुंबणार नाही हे निव्वळ आश्वासन ठरले. दै. पुढारीने मुंबई तुंबण्याची सहा कारणे मंगळव ारच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाले आहे. याची दखल घेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी बुधवारी आढावा बैठक घेणार असून या कारणांवर सविस्तर चर्चा करणार आहेत.
सर्व परिमंडळांतील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि पर्जन्य जलवाहिनी विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात येणार आहे.
मुंबईत १५ दिवस आधी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. असे असताना महापालिकेचे मान्सूनपूर्व कामांचे नियोजन फसल्याचे स्पष्ट झाले आहे.
२५ मेला पाण्याचा निचरा करणारे पंप कार्यरत करण्याचे कंत्राटदारांना निर्देश होते, मात्र ते केले नाहीत, त्यामुळे पंप बंद होते. कामांचे साहित्य, राडारोडा, रस्त्याच्या, नाल्यांच्या बाजूला पडून होता. हे साहित्य ३१ मेनंतर म्हणजे १ जूननंतर हलवण्याचे ठरले होते. तसेच अपूर्ण नालेसफाई, रस्त्यांची खोदकामे, पाऊस जास्त पडला त्याचवेळी समुद्राला भरती होती. नवीन निर्माण झालेली पाणी भरणारी ठिकाणे या सहा कारणांमुळे मुंबईत पाणी साचले. पंपिंग स्टेशन व इतर कामांमुळे हिंदमाता येथे मागील दोन वर्षांपासून पाणी तुंबत नव्हते. यंदा पंप बंद राहिल्याने येथेही पाणी तुंबल्याचे समोर आले आहे. यावर आढावा बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
फ्लड गेट, पाणी साठवण टाक्या, पंपिंग स्टेशनच्या उपाययोजना
पाणी निचरा करणारे पंप बंद, कुचकामी
मुख्य नाल्यांसह, लहान गटारांची सफाई सुरूच
मिठीची फक्त ५३ टक्के सफाई
सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे अपूर्णच
रस्त्यांची खोदकामे
३१ मेआधी नालेसफाई,
रस्तेकामे पूर्ण करण्याचे निर्देश होते. मात्र तीन दिवस उरले तरी अजूनही १८ टक्के नालेसफाई अपूर्ण आहे. ही पालिकेची आकडेवारी डॅशबोर्डवर अपडेट करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाले गाळातच आहेत.
सोमवारच्या मुसळधार पावसाने हिंदमाता व सायन रोड नंबर २४ पुन्हा पाण्याखाली गेला. त्यामुळे पालिकेने ही समस्या सुटावी म्हणून आतापर्यंत खर्च केलेला कोट्यवधींचा निधीही पाण्यात गेला काय, असा सवाल मुंबईकर करीत आहेत.
हिंदमाता सिनेमा व सायन रोड नंबर २४ येथे पाणी तुंबणे नित्याचे झाले आहे. समुद्रसपाटीपासून हा भाग बशीसारखा असल्यामुळे थोड्याशाही पावसात या परिसरात पाणी तुंबत असते. यावर उपाय म्हणून महापालिकेने २०० कोटी रुपये खर्च करून भूमिगत टाक्यांत पंप बसवण्यात आले असून या पंपाद्वारे टाकीत साठलेले पाणी समुद्रापर्यंत वाहून नेले जाते, तर सायन येथेही पाणी तुंबू नये यासाठी आतापर्यंत १०० कोटी रुपये पेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. पावसाळ्यात किती प्रमाणात पाणी साठवून राहते, याचा अभ्यास करून साधारणतः १५ ते २० दशलक्ष लिटर पाणी साठवता येईल. म्हणजेच १ कोटी ५० लाख ते २ कोटी लिटर एवढ्या क्षमता असलेल्या टाक्या उभारण्याचा विचार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.