

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
गेली पाच-सहा दिवसांपासून हवामानाच्या लहरीपणाचा फटका खाडीपट्टयातील आंबा बागायतदारांना बसला असून औषध फवारण्याचा खर्च वाया जाण्याची भीती आंबा बागायतदारांनी व्यक्त करून गतवर्षी झालेले भरमसाठ नुकसानीतून बाहेर कसे पडणार असा निराशाजनक सूर असून विमा कंपन्यांकडून मिळालेली नुकसान भरपाई ही नगण्य असल्याची प्रतिक्रिया बागायतदारांनी दिली आहे.
गेली कित्येक दिवस हवामानाच्या लहरीपणाचा फटका खाडीपट्टयातील आंबा बागायतीला बसत असून गेली सात-आठ दिवसांपूर्वी हूडहुडी भरणारी पडलेली थंडी आंबा पिकासह कडधान्यासाठी पोषक होती, मात्र थंडी अचानक गायब होऊन वातावरणात उकाडा वाढला होता. त्यामुळे आठ-दहा दिवसांपूर्वी केलेली आंबा वृक्षांवर फवारणी वाया जाणार असल्याचे भीती आंबा बागायतदारांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे गेली दोन दिवसांपासून बर्यापैकी थंडी पडायला सुरुवात झाली असून थंडीमध्ये अजून वाढ होणे गरजेचे असून त्यामुळे संभाव्य धोका टळू शकतो आणि आंबा पिकासह कडधान्याला चांगले दिवस येतील असा विश्वास येथील शेतकर्यांसह आंबा बागायतदारांनी व्यक्त केला आहे.
फेंगल चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतरही अरबी समुद्रात कमी दाबाचा प्रभाव कायम आहे. या प्रभावाखाली चार दिवसांपूर्वी सर्वत्र ढगाळ वातावरण पसरले होते. यामुळे थंडी पूर्ण गायब होऊन वातावरणात उकाडा जाणवत होता. प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवल्याप्रमाणे आभाळ निरभ्र होण्यास सुरुवात होऊन वातावरणात झालेल्या बदलाचा येथील दुबार शेतीसह आंबा, काजू पिकाला मोठा धोका पोहचण्याची लक्षणे वाटत होती, मात्र गेली दोन दिवसांपासून वातारणात पुन्हा चांगला आणि दुबार शेतीसह काजू, आंबा पिकाला पोषक वातावरण तयार झाल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रति झाडाला फवारणी करण्यासाठी एकूण चारशे ते पाचशे रुपये खर्च येत असून तसेच इन्शुरन्स प्रत्येकी झाडामागे काढावा लागला आहे. मात्र मागील वर्षी आंबा पिकाला बसलेला फटका आणि त्यातून झालेले भरमसाठ नुकसान भरुन निघाले नसल्याची खंत शेतकर्यांनी सांगून विमा कंपन्यांनी चांगले निकष लावले नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले. अनुकूल वातावरणात सुरू झालेल्या आंबा बेगमीच्या काळात हवामानाच्या झालेल्या अचानक बदलाचा फटका आंबा बागायतीला बसू शकतो, मात्र सुदैवाने पून्हा थंडी सुरु झाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे, मात्र वातावरणात झालेला बदल त्यामुळे पुन्हा थंडी पडायला सुरुवात झाली आहे. यामध्ये सातत्य टिकून राहिल्यास निश्चितच आंबा बागायतीला फायदा होईल असे आंबा बागायतदारांनी सांगितले.
आंबा कलमांची जोपासना करण्यापासून कलमांचे इन्शुरन्स काढण्यापर्यंत भरपूर खर्च येत आहे, मात्र अशाप्रकारे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसून केलेल्या खर्चावर पाणी फेरत असून आणखीनच चिंता वाढली आहे. मात्र वातावरणात चांगला बदल झालेला आहे.
आरिफ उभारे, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त, चिंभावे