

मुंबई : राजेश सावंत
वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय (राणीबाग) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात अखेर तिसरी घंटा वाजणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या नाट्यगृहामध्ये सलग आठवडाभर व्यावसायिक नाटकाचे प्रयोग ठेवण्यात येणार असून, मराठी लोकवस्ती असलेल्या लालबाग, परळ, माझगाव आदी भागातील नाट्य रसिकांना आवडते नाटक बघता येणार आहे.
या नाट्यगृहाचा पडदा मुख्यमंत्र्यांनी उघडला असला तरी, नाटकाची तिसरी घंटा वाजलेली नाही. काही तांत्रिक अडचणी व रंगमंचाची मांडणी योग्य नसल्यामुळे येथे व्यावसायिक नाटक करणे शक्य नव्हते. मात्र आता सुधारणा करण्यात येत असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. ही आनंद वार्ता रसिकांपर्यंत जावी म्हणून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाट्य महोत्सव भरवण्यात येत आहे.
साठे नाट्यगृहात व्यावसायिक नाटक वाद्य रुंद व अन्य कार्यक्रम करण्यासाठी निर्मात्यांशी चर्चा करण्यात आली असून लवकरच याबाबत अधिकृत निर्णय घोषित करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दररोज एक ते दोन प्रयोग वेगवेगळ्या नाटकांचे आयोजित करण्यात येणार आहेत. या नाटकांना नाट्य रसिकांचा प्रतिसाद मिळावा यासाठी तिकिटाचा दरही कमीत कमी ठेवण्यात येणार आहे. यासाठी नाट्य निर्मात्यांना मोफत नाट्यगृह उपलब्ध करून देण्याचाही पर्याय ठेवण्यात आला आहे.
४२ वर्षानंतर पुन्हा गजबजणार नाट्यगृह
राणी बागेमध्ये १९६३ मध्ये ४५० प्रेक्षकांसाठी खुले नाटयगृह महापालिकेने सुरु केले. पण नाट्यगृहातील आवाजाने राणीबागेतील प्राणी दचकत असल्याने १९८४ मध्ये हे नाटयगृह बंद करण्यात आले. अखेर हे खुले नाट्यगृह कायमचे बंद करून त्या ठिकाणी बंदिस्त नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला. पण यासाठी तब्बल ४२ वर्षाचा कालावधी लागला. आता एवढ्या मोठ्या प्रतीक्षा नंतर राणी बागेतील साठे नाट्यगृह प्रेक्षकांनी गजबज होऊन जाणार आहे.
मुंबईत होती खुल्या नाट्यगृहाची परंपरा
मुंबई शहरात पूर्वी बंदिस्त नाट्यगृहापेक्षा खुल्या नाट्यगृहाची परंपरा होती. रसिकांची ही खुला नाट्यगृहाकडे ओढ होती. त्यामुळे बोरीबंदर येथील रंगभवन, वांद्रे येथे बालगंधर्व, शिवडी येथे प्रबोधनकार ठाकरे खुला नाट्यगृहासह भायखळा राणीबाग येथे अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह सुरू करण्यात आले होते.
अत्याधुनिक सुविधा
अत्याधुनिक प्रकाशयोजना, ध्वनीक्षेपण यंत्रणेसह ७६१ आसन क्षमतेचे सुसज्ज वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृहातील रंगमंचाची रुंदी २१ मीटर आहे आणि लांबी ११ मीटर इतकी आहे. नाट्यगृहात (लहान बाळांसाठी खोली), ग्रीन रुम्स, दोन मेकअप रुम्स आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी डिझेलवर चालणारा जनरेटर बसवण्यात आला आहे.