

मुंबई: भायखळा राणी बागेतील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत काही परवानग्या मिळालेल्या नसून रंगीत तालीमही झालेली नाही.
त्यामुळे नाट्यगृहात नाटकाची घंटा वाजण्यास अजून महिन्याभराचा वेळ लागणार आहे. त्यामुळे व्यावसायिक नाटकांचे प्रयोग करणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.
राणीबाग परिसरात सुसज्ज अण्णाभाऊ साठे नाट्यगृह उभे राहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी नाट्यगृहाचा पडदा उघडला असला तरी, येथे व्यावसायिक नाटक होण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या अद्यापपर्यंत मिळालेल्या नाहीत.
व्यावसायिक नाटक ठेवण्यापूर्वी नाटकांच्या रंगीत तालीम घेऊन येथील साऊंड सिस्टम, प्रकाश योजना, रंगमंचाची व्यवस्था अन्य सेवा सुविधा योग्य पद्धतीने आहेत की नाही, याची चाचपणी करणे आवश्यक आहे. एखादे व्यावसायिक नाटक ठेवल्यानंतर ऐनवेळी नाट्य कलाकारांसह रसिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
अत्याधुनिक प्रकाशयोजना, अत्याधुनिक ध्वनीक्षेपण यंत्रणेसह ७६१ आसनक्षमतेचे सुसज्ज वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृहातील रंगमंचाची रुंदी २१ मीटर आहे आणि लांबी ११ मीटर इतकी आहे. नाट्यगृहात क्रायरूम (लहान बाळांसाठी खोली), ग्रीन रुम्स, दोन मेकअप रुम्स यांची सुविधा उपलब्ध आहे.
नाट्यगृहामध्ये विद्युत पुरवठा काही कारणास्तव खंडित झाल्यास विद्युत
पुरवठा पूर्ववत करण्यासाठी डिझेलवर चालणारा जनरेटर बसवण्यात आला आहे. मात्र ही व्यवस्था योग्य पद्धतीने चालते की नाही याची चाचपणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे या नाट्यगृहात प्रत्यक्ष नाट्यप्रयोग होण्यास विलंब लागत असल्याचे पालिकेचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
भाड्याबाबत लवकरच निर्णय
परळ, लालबाग, काळाचौकी, माझगाव या मराठी लोकवस्तीमध्ये नाट्यगृह नसल्यामुळे येथे मराठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या नाट्यगृहात होणाऱ्या नाट्यप्रयोगांसह अन्य कार्यक्रम हाउसफुल होणार आहेत. त्यानुसार नाट्यगृहाच्या भाड्याचे दर निश्चित करण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच होईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.