

मुंबई : लहानपणीचा छंद जीवनाच्या उतार वयापर्यंत जोपासणारी फारच कमी माणसे जगात असतात. असेच एक व्यक्तिमत्त्व आहे शैलजा कामत. कामत यांना बालपणी लागलेला चित्रकलेचा छंद त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षापर्यंत जोपासला आहे. शैलजा एस. कामत यांचे ‘बियॉण्ड द शेप्स’ हे प्रदर्शन अंधेरी पूर्वेतील लीला आर्ट गॅलरीत 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान प्रेक्षकांसाठी खुले राहणार आहे. शहर आणि निसर्गाच्या संगमाचे दर्शन घडवणारा कलाविष्कार नागरिकांना येथे पाहायला मिळणार आहे.
79 वर्षीय ज्येष्ठ चित्रकार शैलजा एस. कामत एकल प्रदर्शनात शहर आणि निसर्ग यांचे सौंदर्य रंगांच्या माध्यमातून जिवंत करणार आहेत. ‘बियॉण्ड द शेप्स’ प्रदर्शनातून शहरांचे रूप, निसर्गप्रेरित चित्रे आणि कल्पक दृष्टिकोनाचे दर्शन सर्वांना घडणार आहे. वयाच्या या टप्प्यावरही त्यांचा रंगांवरील प्रयोगशील दृष्टीकोन आणि कलाप्रेम अधिकच गहिरे होत गेले आहे. बाह्य दृश्यांपेक्षा कल्पनाशक्तीवर अधिक भर देत, त्या आपली चित्रे जगाशी चाललेल्या दृश्य संवादासारखी साकारत आहेत.
कामत यांची कलायात्रा वयाच्या आठव्या-दहाव्या वर्षापासूनच शुभेच्छा पत्रांवर वॉटरकलरने रंगवण्यापासून सुरू झाली. छंद म्हणून केलेले हे प्रयोग पुढे आजीवन आवडीत रूपांतरित झाले. औपचारिक प्रशिक्षण नसतानाही त्यांनी केवळ कलाप्रेमातून चित्रकला जोपासली. पुढे सुप्रसिद्ध कलाकार, कलाशिक्षक सत्येंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली तंत्रकौशल्ये परिष्कृत केली आणि ॲक्रिलिक रंगांमध्ये स्वतःची खास दृश्यभाषा शोधली. रंगीबेरंगी शहररूप, ज्यात शिस्त आणि भावनांचा संगम दिसतो.
‘बियॉण्ड द शेप्स’ या प्रदर्शनात कामत शहररचना आणि निसर्ग यातील नातेसंबंध मांडतात. काँक्रीटची रचना आणि निसर्गातील शांतता, मानवनिर्मित शिस्त आणि सेंद्रिय सौंदर्य यांचा संवाद त्यात आहे.
भारतातील तसेच दुबईतील विविध प्रदर्शनांत त्यांनी आपली चित्रे सादर केली आहेत. शहररूपातील कलाकृती ही त्यांच्या आयुष्यभराच्या आवडीची नैसर्गिक प्रगती आहे, असे त्या सांगतात. “लहानपणापासूनच वास्तुरचना आणि इमारतींवर प्रकाश पडण्याच्या विविध छटा मला मोहवायच्या. त्या निरीक्षणांना कधी प्रत्यक्ष, कधी अमूर्त स्वरूपात मी रंगांद्वारे मांडते. हा संपूर्ण प्रवास ध्यानसदृश आहे आणि रंगांमधून उमटणाऱ्या भावना मला प्रचंड आनंद देतात,” असे त्या म्हणतात. या प्रदर्शनात ॲक्रिलिक आणि वॉटरकलरमधील सुमारे 25 ते 30 चित्रांचा समावेश आहे. या सर्व कलाकृती तयार व्हायला सुमारे आठ ते दहा वर्षे लागली, अशी माहिती कामत यांनी दिली.
या प्रदर्शनात मी देशातील विविध शहररचना आणि निसर्गदृश्ये मांडली आहेत. शहरी भागातील घनदाट रचना, ग्रामीण गावे आणि मंदिरांचे शांत दृश्य तसेच निसर्गातील वैविध्य हे सर्व यात आहे. मानवनिर्मित रचना आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा संगम प्रेक्षकांनी नव्या दृष्टिकोनातून अनुभवावा हीच इच्छा आहे.
शैलजा कामत, ज्येष्ठ चित्रकार