

मुंबई : शिक्षण मजेदार, सर्वसमावेशक आणि व्यावहारिक व्हावे यासाठी मुंबईच्या बॉम्बे इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या विहान तन्नन या सतरा वर्षीय विद्यार्थ्याने एक अनोखी शैक्षणिक पद्धती तयार केली आहे. ब्रिक बाय ब्रिक या संस्थेचे संस्थापक म्हणून कार्य करताना विहानने ब्रिक लर्निंग टूलकिट तयार केले आहे.
या टूलकिटमध्ये मुलांच्या शिकण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी डिझाइन केलेली आठ नाविन्यपूर्ण किट्स आहेत. या टूलकिटमधील प्रत्येक किट प्रयोगाद्वारे सर्जनशीलता, सहयोग आणि समस्या सोडवणे यासारखी विविध कौशल्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते. या पद्धतीबद्दल सांगताना विहान म्हणाला, “शिकणे खेळकर आणि ओपन-एंडेड बनवल्यास विद्यार्थी त्यावर विचार करतील आणि विषय समजून घेऊन त्यातल्या संकल्पना लक्षात ठेवतील इतकी सोपी ही पद्धत आहे.”
हे टूलकिट तयार करण्याची प्रेरणा विहानला स्वत:च्या बालपणातून मिळाली. “मी लेगोवर खेळतच मोठा झालो. लेगोने मला सर्जनशीलता आणि संयम शिकवला जो पाठ्यपुस्तके वाचून कधीही शिकला जाऊ शकत नाही,” असे विहान म्हणाला. टीच फॉर इंडिया आणि एडाप्ट या वंचित समुदायातील मुलांना आधार देणाऱ्या संस्थांमध्ये स्वयंसेवा करताना विहानला त्याची जाणीव झाली. “यापैकी बऱ्याच मुलांनी हँड्स-ऑन लर्निंग टूल्स कधीच वापरली नव्हती. त्यांचं शिक्षण फक्त पुस्तकी अभ्यासक्रमावर आधारित होतं. तिथे कल्पनाशक्तीला फारसा वाव नव्हता,” असे विहान सांगतो.
त्यात बदलण्याचा निर्धार करून, विहानने वर्गात आपले टूलकिट सादर केले आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून झाला. त्याबद्दल बोलताना विहान म्हणतो, “जी मुले सहसा शांत होती त्यांनी कल्पना मांडण्यास सुरवात केली, एकत्र काम केले आणि अभिमानाने त्यांनी काय तयार केले हे दाखवले. त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि ते समस्या सोडवणाऱ्या लोकांसारखा विचार करू लागले.”
विहानला आशा आहे की, कमी उत्पन्न असलेल्या शाळांमध्ये ही टूलकिट वितरित केली जातील, शिक्षक आणि स्वयंसेवकांना त्यांचा वापर करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल आणि सर्जनशीलता आणि आत्मविश्वासातील सुधारणांचा मागोवा घेण्यासाठी सोपी साधने तयार केली जातील. हे संच पुन्हा वापरण्यायोग्य आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात हजारो मुलांपर्यंत ते पोहोचू शकतील.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी हँड्स-ऑन प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याची विहानची योजना आहे. अगदी थोड्या खर्चात ही सामुग्री विकत घेऊन आणि पीअर-टू-पीअर प्रशिक्षण वापरुन कोणतीही शाळा ही शिक्षण पद्धती अवलंबू शकेल, असे स्केलेबल मॉडेल विकसित करण्याचीही त्याची योजना आहे.
माझ्या लहानपणीची आवड आता केवळ खेळ न राहात शिकण्याचे एक साधन बनले आहे आणि त्याचा वापर करून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून त्यातून सजग विद्यार्थी घडवणे हे माझे मिशन बनले आहे. प्रत्येक मुलाला कल्पना करण्याचे, निर्भयपणे नवीन काही तयार करण्याचे स्वातंत्र्य मिळावेत आणि त्यातून शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी.
विहान तन्नन