

Ganpati Bappa Santa Claus Advertisement: केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या एका जाहिरातीवरून चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं देशातील एका प्रसिद्ध दैनिकाला पहिल्या पानासाठी एक जाहिरात दिली आहे. त्यात गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवण्यात आलं आहे. त्यांना सांताक्लॉजचे कपडे अन् टोपी घातली आहे. यावरून आता हिंदू संघटनांनी कडाडून विरोध करण्यास सुरूवात केली असून सांस्कृतिक मंत्र्यांचा त्वरित पदावरून हटवण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. ही मागणी ब्राम्हण महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.
यावर हिंदू महासभा अन् ब्राम्हण महासभेचे पदाधिकारी आनंद दवे यांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी, 'केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सैजन्यानं एक जाहिरात देण्यात आली आहे. त्यावर गणपतीच्या सोंडेवर सांताक्लॉजचा टोपी घातलेली आहे. देशातील हिंदूंचा, हिंदू देवतांचा अपमान करण्याची हिंमत सांस्कृतिक मंत्रालयाची अन् मंत्र्याची कशी होते हा आमचा सवाल आहे. मोदीजी आपण चर्चमध्ये गेलात म्हणजे तुम्हाला गणपतीचं धर्मांतर करण्याची परवानगी तुम्हाला मिळाली आहे असं आम्ही मानत नाही.' असं वक्तव्य केलं.
याचबरोबर त्यांनी या हरामखोर, नालायक सांस्कृतिक मंत्र्याचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे. आज दुपारी ४ वाजता शनिवार चौकात हिंदू महासभा आंदोलन सुद्धा करणार आहे.' असं सांगत सांस्कृतिक मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी देखील केली.
दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन गणपतीला सांताक्लॉजच्या स्वरूपात दाखवण्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, 'भाजप धर्माचं राजकारण कसं करतं याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. देशातील एक प्रसिद्ध वर्तमानपत्र त्यात आमचे आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉज बनवून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं ही जाहिरात दिली आहे.
यांच्या कामात राम नाही तर राजकारणात राम आहे. याचं हे स्पष्ट उदाहरण आहे. तुम्हीच पाहा सत्ता, पैशासाठी धर्माचा, देवी देवतांचा कसा वापर केला जातो.' या घटनेनंतर राज्यातील अनेकांनी यावर आक्षेप नोंदवण्यास सुरूवात केली आहे.