Air India Flight News
मुंबई : एअर इंडियाचे आणखी एक विमान सोमवारी (दि.२१ जुलै) अपघात होण्यापासून थोडक्यात बचावले. कोची येथून मुंबईला आलेले AI2744 हे विमान जोरदार पावसामुळे मुंबई विमानतळावर लँडिंगनंतर थोडे घसरले. यामुळे ते धावपट्टीवरुन बाहेर गेले. त्यानंतर पायलटने विमानावर पुन्हा नियंत्रण मिळवत विमान सुरक्षितपणे गेटवर आणले. यातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. पुढील तपासणीसाठी हे विमान थांबवण्यात आले आहे. ही घटना सकाळी ९.२७ वाजता घडली.
यातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. यामुळे विमानतळाच्या मुख्य धावपट्टीचे किरकोळ नुकसान झाले आहे. दुसरी पर्यायी धावपट्टी सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (CSMIA) प्रवक्तांनी दिली आहे.
दरम्यान, हे विमान धावपट्टीवरून बाहेर गेल्यानंतर त्याचे तीन टायर फुटले असून इंजिनचेही नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, सदर विमान टचडाऊन झोनजवळ उतरल्यानंतर धावपट्टीपासून १६ ते १७ मीटर दूर गेले. पण ते सुरक्षितपणे परतले आणि सामान्यपणे ते पार्किंग दिशेने नेण्यात आले. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई विमानतळाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, २१ जुलै रोजी सकाळी ९:२७ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) येथे कोचीहून आलेले एक विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवरुन बाहेर गेले. यानंतर ही घटना हाताळण्यासाठी विमानतळावरील आपत्कालीन प्रतिसाद पथकांना तत्काळ सक्रिय करण्यात आले.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) एक पथक याच्या चौकशी करण्यासाठी विमानतळावर आले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.