

Ram Mohan Naidu on Ahmedabad Plane Crash
नवी दिल्ल्ली : अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात आणि तपासाबाबत विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज (दि.२१) राज्यसभेत दिली. अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून संपूर्ण डाटा एएआयबीने यशस्वीरित्या डीकोड केला आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासासाठी आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार संपूर्ण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आवश्यक संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील तपास पूर्ण झाला असून प्राथमिक अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे.
या प्रकरणात “ब्लॅक बॉक्स” म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉपिट व्हॉईस रेकॉर्डर यांची भूमिका महत्त्वाची असते. पूर्वी अशा घटनांमध्ये ब्लॅक बॉक्समध्ये काही नुकसान झाल्यास आपल्याला ते मूळ उत्पादक देशात पाठवूनच माहिती डिकोड करावी लागायची. मात्र, यावेळी भारताने पहिल्यांदाच ठाम भूमिका घेतली आणि अपघातग्रस्त ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण देशातच केले आणि यशस्वीरित्या सर्व माहिती प्राप्त केली, असे त्यांनी सांगितले.
AIB (Aircraft Accident Investigation Bureau) ने फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉपिट व्हॉईस रेकॉर्डरमधून मिळालेली माहिती एकत्र करून प्राथमिक अहवाल तयार केला. या अहवालात “काय घडलं” यावरच भर देण्यात आला आहे. “कसं आणि का घडलं” यासंबंधी अंतिम निष्कर्ष अंतिम अहवालात मांडले जातील. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यासाठी अंतिम अहवालची वाट पाहणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
काही माध्यमांनी, विशेषतः पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी, वेगवेगळ्या गोष्टींचं भांडवल केले आहे. मात्र, AIB पूर्णतः पारदर्शक व निष्पक्षपणे तपास करत आहे. यात वैमानिक, बोईंग, एअर इंडिया किंवा इतर कोणत्याही घटकांविषयी पूर्वग्रह न ठेवता फक्त वस्तुस्थितीवर आधारित तपास चालू आहे.
जगभरात अशा घटना घडल्यावर ICAO (International Civil Aviation Organization) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित देशांमध्येही तपास केला जातो आणि अंतिम अहवालानंतरच दुरुस्तीची शिफारस केली जाते. भारतातही ही आंतरराष्ट्रीय प्रक्रिया संपूर्ण निष्ठेने व काटेकोरपणे पाळली जात आहे, असे नायडू यांनी सांगितले.