

Uddhav Thackeray and Raj Thackeray
मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. आता राज ठाकरे यांचे पुत्र मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनीही, दोन भाऊ एकत्र यावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ''आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र, त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे,'' असे अमित ठाकरे यांनी 'पुढारी न्यूज'शी बोलताना म्हटले आहे.
ते सकाळी उठून बोलतात. ते कोणाला फसवतात? दोन भावांनी एकत्र यावे हे त्यांनी ठरवावे. राज ठाकरे यांची इच्छा असेल तीच ती माझी इच्छा असेल. पुढाकार कोणीही घ्यावा. मी त्यासाठी पुढाकार घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ गोष्टी बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची तयारी राज ठाकरे यांनी याआधी दाखवली होती. तर किरकोळ गोष्टींना बाजूला ठेवण्याची तयारी काही अटीशर्तींसह उद्धव ठाकरेंनीही दाखविल्याने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली गेली होती.
राज ठाकरे यांनी भाजप, शिवसेना शिंदे गटाशी मैत्री तोडली तरच नक्कीच सोबत येऊ शकतो, असे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरेंनी याधीही दिले होते.
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी काही अटींसह मनसेसोबत जाण्याची तयारी दाखविली होती. "मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मीदेखील किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहे. मीदेखील मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन करतो. पण माझी एक अट आहे," असे उद्धव ठाकरे एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते.
महापालिका क्षेत्रात झाडांना खिळे मारुन फलक लावण्याच्या मुद्यावरुही अमित ठाकरे यांनी भाष्य केले आहे. 'तुम्हाला जसा त्रास होतो तसाच झाडाला त्रास होतो. त्यांना गँगरीन होतो आणि ते मरतात. मी आमच्या पक्षापासून सुरुवात करतो. आम्ही जर खिळे मारून फलक लावले तर ते मीच काढायला लावेन. झाडांचे महत्त्व कळले पाहिजे. महापालिकेने ८० किलो खिळे काढले आहेत. मात्र अजूनही खिळे आहेत. झाडे किंचाळत नाही म्हणून आपण त्यांना खिळे मारतो आणि कापतो. मी नागरिकांना विनंती करेन की असे खिळे दिसले की महापालिका किंवा मनसेकडून ते काढून घ्या. खिळे काढले तर पुन्हा झाडे जिवंत राहतात. झाडांची गोष्ट गंभीर आहे. गांभीर्याने घ्यायला हवी. खिळे काढायला काही रॉकेट सायन्स लागत नाही,' असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.