

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला. त्याचवेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबतही माहिती घेतली. याशिवाय, महामंडळांवरील नियुक्त्या तसेच भाजपच्या निवडणूक तयारीचाही आढावा घेतला.
गणेशोत्सव काळात अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर येतात. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याचा त्यांचा शिरस्ता यंदाही कायम राहिला. यानिमित्ताने मुंबईत आलेल्या शहांनी राजकीय बैठकाही घेतल्या. शुक्रवारी रात्री मुंबईत पोहचल्यानंतर त्यांचा मुक्काम सह्याद्री अतिथीगृहात होता. तिथे प्रथम त्यांनी भाजप नेत्यांसोबत अनौपचारिक संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते अतुल लिमये यांच्यासोबतही अमित शाह यांनी चर्चा केली. तर, शनिवारी (दि.30) रोजी लालबागच्या राजासह मुंबईतील गणेश मंडळातील गणपतीच्या दर्शनाला निघण्यापूर्वी अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही चर्चा केली.
सह्याद्री अतिथीगृहात अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. यावेळी मराठा आर क्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील संभाव्य युतीबाबतही चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, अमित शहा यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्यासोबतही चर्चा केली. एरवी दिल्लीत असणाऱ्या तावडे यांची शहा यांनी मुंबईत भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.