

नवी दिल्ली: सभापतींची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. कोणत्यातरी पक्षातून निवडून आले तरी सभापती बनल्यावर ते निष्पक्ष पंच होतात. निष्पक्षता आणि न्याय हे सभापतींच्या कार्याचे दोन स्तंभ असले पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले. रविवारी दिल्ली विधानसभेत अखिल भारतीय पिठासीन अध्यक्ष परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. दिल्ली विधानसभेचे पहिले निवडून आलेले अध्यक्ष विट्ठलभाई पटेल यांच्या पदग्रहण कार्यक्रमाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या वेळी अमित शाह यांच्यासह दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेण रिजिजू, दिल्लीचे नायब उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता तसेच विविध राज्यांतील विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विधान परिषद सभापती, उपसभापती उपस्थित होते. महाराष्ट्रातून विधान परिषद सभापती राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.
अमित शहा यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यसैनिक विट्ठलभाई पटेल यांना भारतीय विधायी परंपरेचे भीष्मपितामह संबोधले आणि त्यांचे योगदान अधोरेखित केले. अमित शहा म्हणाले की, विट्ठलभाई पटेल यांनी अनेक परंपरा स्थापन केल्या, ज्या आजही विधायी कामकाजात मार्गदर्शक ठरत आहेत. विधानसभेच्या स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत कोणतीही विधानसभा निवडून आलेल्या सरकारच्या अधीन नसावी. भारतीय लोकशाहीने जगात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे आणि याचे श्रेय आपल्या विधायी संस्थांच्या मजबूत परंपरेला जाते. विधानसभांनी पक्षीय स्वार्थाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहिताचे चिंतन करावे, हाच खरा लोकशाहीचा आत्मा आहे
अमित शहा म्हणाले की, विधानसभांमध्ये चर्चा आणि वादविवाद हे लोकशाहीचे मूलभूत अंग आहेत. मात्र, राजकीय स्वार्थासाठी संपूर्ण अधिवेशन ठप्प करणे हे योग्य नाही. विरोध हा संयमित असावा. विवेक, विचार आणि विधान या त्रिसूत्रीवर विधानसभांचे कार्य आधारित असले पाहिजे. विवेकातून विचार, विचारातून विधान, आणि त्या विधानाचा अंतिम उद्देश जनकल्याण असावा, असेही ते म्हणाले. विट्ठलभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटनही यावेळी झाले. अशी प्रदर्शने देशभरातील सर्व विधानसभांमध्ये लावावीत आणि यासंबंधी भाषणांचे संकलन सर्व विधानसभांच्या ग्रंथालयात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.