

Ambadas Danve On Eknath Shinde:
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत राज्य आणि देश पातळीवरील विरोधक एकत्र येऊन आघाड्या करत आहेत. कुठं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत तर कुठं दोन्ही शिवसेनेचे गट एकत्र आघाड्या करताना दिसत आहेत.
दरम्यान, अशाच एका आघाडीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आघाडीत शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस एकत्र असल्याचं चित्र आहे. त्याबाबतचे पोस्टर लावण्यात आलं असून त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधपक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा एकत्रित फोटो आहे. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे गटावर बोचरी टीका केली.
अंबादास दानवे आपल्या पोस्टरमध्ये लिहितात, 'काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सुरत-गुवाहाटी-गोवा असा पळपुटा प्रवास केलात आणि नाकाने वांगे सोलले.. आता घ्या! कटप्रमुख एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकाच बॅनरवर.. ते ही धनुष्यबाण चिन्हासह! थोडक्यात, दिल्लीश्वरांच्या भीतीने 'बाळासाहेबांचे विचार' खुंटीला टांगले आहेत. याला म्हणतात बुडाखालील अंधार!'
अंबादास दानवे यांनी शेअर केलेले पोस्टर हे उमरगा नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २ च्या उमेदवाराचे आहे. शिवसेना, काँग्रेस, लहुजी शक्ती सेना, रयत क्रांती आणि मित्र शहर विकास पॅनल नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत.