Phaltan Doctor Death| व्यवस्थेशी लढणाऱ्या डॉ. मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे : अंबादास दानवे
वडवणी : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉ. संपदा मुंडे प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत. वेळ कितीही लागला तरी संपदेला न्याय मिळालाच पाहिजे, असा निर्धार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. कवडगाव येथे त्यांनी डॉ. मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, हे बलिदान ही केवळ एका व्यक्तीची वेदना नसून, दबावाखाली चुकीची कामे करायला भाग पाडणाऱ्या व्यवस्थेचं प्रतिबिंब आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी डॉक्टर होणं, ही अभिमानाची गोष्ट आहे. पण अशा डॉक्टर मुलीवर एवढा भयानक प्रसंग ओढवणं, ही संपूर्ण समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे.
दानवे पुढे म्हणाले की, डॉ. मुंडे यांच्या कुटुंबासोबत आम्ही आहोत. न्याय कसा मिळेल? यासाठी आम्ही प्रत्येक स्तरावर प्रयत्न करू. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. फलटण पोलिसांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, फलटण पोलीस ठाणे म्हणजे राज्यकर्त्यांच्या घरी पाणी भरणारे पोलीस ठाणे झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. मात्र, सर्व पोलीस दोषी नाहीत, काही चांगले अधिकारी आजही प्रामाणिकपणे काम करत आहेत. महिला आयोगावर टीका करताना दानवे म्हणाले, महिला आयोग हे फक्त नामधारी झाले आहे. महिलांच्या न्यायासाठी ते खरं काम करत नाहीत. या प्रकरणावर पुढील पाऊल म्हणून दानवे यांनी घोषणा केली की, शिवसेनेच्या वतीने उद्या फलटण येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. जर सरकारला या आंदोलनानेही जाग आली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे काढले जातील. डॉ. मुंडे यांच्या मृत्यूच्या तपासात निष्पक्षता यावी, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी यावेळी पुन्हा एकदा केली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, उल्हास गिराम, माजी जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे, माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, नितीन धांडे, वडवणी तालुकाप्रमुख विनायक मुळे सह आदी शिवसैनिक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्या पोलीस ठाण्यासमोर आंदोलन
डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा, याकरिता उद्या फलटण पोलीस ठाण्यासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते, महिला आघाडी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सरकारकडून याप्रकरणी अद्याप न्याय न मिळाल्याने जनतेत संताप आहे. जर या आंदोलनानंतरही सरकारला जाग आली नाही, तर पुढील आठ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रभर मोठे आंदोलन उभारण्यात येईल,असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

