

मुंबई : उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातामागे असलेल्या व्यक्तीला वाचवणारा नेता कोण, अशी विचारणा करणारे मोठे पोस्टर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोर लावण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून असलेले हे पोस्टर आणि त्यामधील मफलर चित्राविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, रात्री उशिरा हा फलक हटवण्यात आला. हे पोस्टर कोणी लावले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा नाव समोर आलेले नाही. त्या पोस्टरवर "अजितदादांच्या अपघात/घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा 'मफलरवाला' नेता कोण, असा सवाल विचारण्यात आला आहे. या पोस्टरवर मफलरची प्रतिकृती दाखवण्यात आली असली तरी कोणत्याही नेत्याचे थेट नाव लिहिलेले नाही.
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास हा विमान अपघात तपास ब्युरो, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू आहे. प्राथमिक तपासात कमी दृश्यमानता आणि तांत्रिक बिघाड यांसारख्या कारणांचा उल्लेख असला, तरी अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही.
यामुळे कोण आणि कोणाला वाचवत असल्याचा निनावी पोस्टर्सची चर्चा सुरू आहे. १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता याबाबत पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याचे समजते. यामधून मफलरवाली व्यक्ती कोण, याबाबत खुलासा केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.