

मुंबई : महामुंबईतील वाहनधारकांना इंधन दरवाढीचा आणखी एक फटका शनिवारी बसला. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत आता सीएनजीचा नवीन दर ९१.५० रुपये प्रतिकिलो झाला आहे. हे नवे दर १४ नोव्हेंबर २०२६च्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.
महानगर गॅस लिमिटेडने यापूर्वी ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपयाची वाढ केली होती. त्याला महिनाही पूर्ण झालेला नसताना, १५ दिवसांत ही दुसरी दरवाढ केली आहे. वर्षभरात मुंबईत सीएनजीच्या दरात झालेली ही आठवी वाढ आहे. जानेवारी २०२६ मध्ये ८०.५० रुपये प्रति किलो असलेला दर आता ९१.५० रुपयांवर गेला आहे.
सातत्याने होणाऱ्या या दरवाढीचा परिणाम सीएनजीवर चालणाऱ्या जवळपास १२.९३ लाख वाहनांवर होणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील लाखो रिक्षा टॅक्सी, बेस्ट बसेस आणि सीएनजी कार वापरणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारकांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
एमजीएलने १ ऑक्टोबरपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपयाने वाढ करून तो ८९ रुपये प्रति किलो केला होता. त्यापूर्वी सप्टेंबरमध्ये कंपनीने दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ करून दर ८८ रुपये प्रति किलो केला होता. मे महिन्यातही एमजीएलने सीएनजीचे दर ८६ रुपये प्रति किलो आणि पीएनजीचे दर ५२ रुपये प्रति एससीएम असे सुधारित केले होते.
मध्य-पूर्व देशांतील संकटामुळे देशांतर्गत गॅस वाटपात घट झाली आहे. त्यामुळे कंपनीला महागड्या आयात गॅसवर अधिक अवलंबून राहावे लागत आहे. हा अतिरिक्त आर्थिक बोजा अंशतः कमी करण्यासाठीच ही दरवाढ करावी लागल्याचे महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले आहे.