

मुंबई : महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेने (शिंदे) हात झटकल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत अखेर स्वबळावर निवडणूक लढणार आहे. या पक्षाची पहिली 50 उमेदवारांची यादी आज (रविवारी) जाहीर होणार आहे. दरम्यान, पुण्यात शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या घडामोडीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा फिस्कटल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाने महाविकास आघाडीसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मनसेलाही यात सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी मात्र, एकाकी पडल्याचे स्पष्ट होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने आता महायुतीमधील भाजपा आणि शिंदे गटाच्या जागावाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईत 9 नगरसेवक होते. त्यानुसार आपल्या पक्षालाही 9 पेक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे हे भाजप नेते आशिष शेलार यांच्याशी चर्चा करत होते. मात्र, दोन वेळा बैठका होऊनही भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही मुंबईत किमान 75 ते 100 जागा लढवू, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका नेत्याने व्यक्त केला आहे.
या पक्षाची पहिली यादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे शनिवारी संध्याकाळी जाहीर करणार होते. परंतु, महत्वाच्या कामानिमित्त ते मुंबईबाहेर गेल्यामुळे सदर यादी जाहीर होऊ शकली नाही.
नवाब मलिकांमुळे अडले घोडे
गुन्हेगारीचा आरोप असलेले पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सूत्रे दिल्यास, आम्ही युती करणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या भूमिकेत बदल केला नाही. राष्ट्रवादीच्या निवडणुकीचे सूत्रेच मलिक यांच्याकडे दिल्यामुळे महायुती मधील भाजप आणि शिंदे गटाची चर्चा होत असताना बैठकांना राष्ट्रवादी काँग्रेसला एकदाही बोलावले नाही. दोन्ही पक्ष आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे अखेरीस राष्ट्रवादीला स्वबळाचा नारा देत निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले आहे.
मलिकांच्या घरात तिघांना उमेदवारी
विशेष म्हणजे, रविवारी जाहीर होणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत यादी नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तीन जणांना उमेदवारी दिली असल्याचे समजते. मलिक यांचे बंधू कप्तान मलिक हे प्रभाग क्रमांक 165 मधून नशीब आजमावणार आहेत. कप्तान मलिक यांच्या सून बुशरा मलिक या प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणूक लढणार आहेत, तर नवाब मलिक यांची बहीण सईदा खान प्रभाग क्रमांक 168 मधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. सईदा खान या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत.