Maharashtra Politics Ajit Pawar NCP
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत आहे. पक्षाचे सहा माजी आमदार पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महत्त्वाच्या बैठकांना डावलले जात असल्याने आणि पक्षात कोणतीही जबाबदारी दिली जात नसल्याने या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. (Maharashtra Politics)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे यांचा नाराज असलेल्या नेत्यांमध्ये समावेश आहे. पक्षाच्या कोणत्याही बैठकीत आपल्याला बोलावले जात नाही किंवा विश्वासात घेतले जात नाही, अशी खंत या आमदारांनी व्यक्त केली आहे. तसेच पक्षात आपली भूमिका काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्या नेत्यांना मोठा मान-सन्मान दिला जातो; पण ज्यांनी पक्षाच्या सर्वात कठीण काळात निष्ठेने पक्षाची साथ दिली, त्यांनाच आता डावलले जात आहे, असे या नाराजीमागे कारण सांगितले जात आहे. पक्षाच्या अडीअडचणीच्या काळात पक्षाच्या सोबत असलेल्या माजी आमदारांना अशी वागणूक का? असा सवाल या माजी आमदारांनी उपस्थित केला आहे.