Malegao Sugar Factory Election Result : 'माळेगाव'चा कौल उपमुख्यमंत्री पवार यांच्या बाजूने, अजितदादा प्रचंड मताधिक्याने विजयी

सहकार बचाव शेतकरी पॅनेलची कडवी लढत, शरद पवार गटाचे पॅनेल निष्प्रभ
Ajit Pawar Malegao Sugar Factory Election Result
File Photo
Published on
Updated on

बारामती : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीची मतमोजणी मंगळवारी (दि. २४) रात्री उशीरापर्यंत सुरु होती. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील श्री. निलकंठेश्वर पॅनेलने २१ पैकी १० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. माळेगाववरील सत्ता कायम राखण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यशस्वी ठरत असल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येत आहे. ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार एकतर्फी लढतीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. दुसरीकडे ज्येष्ठ सहकार नेते चंद्रराव तावरे, रंजनकुमार तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेलला सभासदांनी अपेक्षित साथ दिली नसल्याचे दिसून येत आहे. त्यांचे फक्त दोन उमेदवार आघाडीवर होते.

माळेगावसाठी रविवारी १७ हजार ३९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीला बारामतीतील प्रशासकीय भवनातील अभियांत्रिकी भवनाच्या तळमजल्यावर मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. सुरुवातीलाच ब वर्ग प्रतिनिधी गटाची मोजणी करण्यात आली. यामध्ये निलकंठेश्वरकडून उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार हे उमेदवार होते. या गटात १०१ मतदान झाले होते. त्यापैकी पवार यांना ९१ तर सहकार बचावच्या भालचंद्र बापूराव देवकाते यांना अवघी १० मते मिळाली.

उत्पादक गटात गट क्रमांक एक माळेगावमधील ९२८२ मते रात्री साडेनऊपर्यंत मोजली गेली. त्यात श्री. निलकंठेश्वर पॅनेलचे बाळासाहेब पाटील तावरे यांना १५४८, रणजित उर्फ शिवराज प्रतापसिंह जाधवराव यांना १६८२ तर राजेंद्र सखाराम बुरुंगले यांना १५१७ मते मिळाली होती. सहकार बचावचे रंजनकुमार शंकरराव तावरे यांना १३७७, संग्राम उर्फ गजानन शंकरराव काटे यांना १२०० तर रमेश शंकरराव गोफणे यांना ११०० मते मिळाली होती.

पणदरे या गट क्र. २ मधूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री. निलकंठेश्वर पॅनेलचे तानाजी तात्यासो कोकरे, योगेश धनसिंग जगताप व स्वप्निल शिवाजीराव जगताप हे उमेदवार आघाडीवर होते.

सांगवी गट क्रमांक तीनची मतमोजणी सुरु होती. तेथे सहकार बचावच्या चंद्रराव कृष्णराव तावरे यांना दीडशे मतांची आघाडी होती. निलकंठेश्वरचे अन्य दोन उमेदवार या गटातूनही आघाडीवरच होते. सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे चंद्रराव तावरे आणि महिला राखीव गटातील राजश्री कोकरे वगळता या पॅनेलला अन्यत्र आघाडी मिळालेली नसल्याची स्थिती रात्री साडेनऊ पर्यंत होती.

मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत अनुसुचित जाती जमाती मतदारसंघाची ८३१६ मते मोजली गेली. त्यात निलकंठेश्वरचे रतनकुमार साहेबराव भोसले यांना ४११७, सहकार बचावच्या बापूराव आप्पा गायकवाड यांना ३७१७ मते मिळाली. या गटातील अर्जून सीताराम भोसले यांना १५, राजू श्रीरंग भोसले यांना ४१७ तर प्रताप पांडूरंग सातपुते यांना ५० मते मिळाली.

इतर मागास प्रवर्गातील ८३५३ मते मोजण्यात आली. त्यामध्ये निलकंठेश्वर पॅनेलच्या नितीन वामनराव शेंडे यांना ४१२०, सहकार बचावच्या रामचंद्र कोंडीबा नाळे यांना ३६४४ मते मिळाली. इतर उमेदवारांमध्ये भरत दत्तात्रय बनकर यांना ४३७, अरविंद भिमदेव बनसोडे यांना १५२ मते मिळाली.

भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातील ८२७४ मते मोजण्यात आली. त्यात निलकंठेश्वरच्या विलास ऋषिकांत देवकाते यांना ४२६९, सहकार बचावच्या सुर्याजी तात्यासो देवकाते यांना ३२८८ मते मिळाली. इतर उमेदवारांमध्ये बाळासो रामचंद्र गीते यांना ६६, अनिकेत अजितकुमार देवकाते यांना २४, आबासो पांडूरंग देवकाते यांना ६१, ज्ञानदेव साहेबराव बुरुगंले यांना ५६६ मते मिळाली.

महिला राखीव गटातील ८५९९ मते मोजली गेली. त्यात निलकंठेश्वर पॅनेलच्या संगीता बाळासाहेब कोकरे यांना २१६१, ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले यांना १९५९ मते मिळाली. सहकार बचावच्या राजश्री बापूराव कोकरे यांना २०२२, सुमन तुळशीराम गावडे यांना १५४५ मते मिळाली. इतर उमेदवारांमध्ये शकुंतला शिवाजी कोकरे यांना ४६१, संगीता भरत कोकरे यांना ६१, संगीता दत्तात्रय खोमणे यांना ५३, पुष्पा मोहनराव गावडे यांना १५६, प्रमिला पोपट निगडे यांना १९९ मते मिळाली.

सांगवी गटानंतर गट क्रमांक चार खांडज-शिरवली, गट क्रमांक ५ निरावागज आणि गट क्र. ६ बारामती हे अद्याप मोजणी करणे बाकी आहे. बुधवारी सकाळपर्यंत ही मोजणी प्रक्रिया सुरु राहिल असे निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी सांगितले.

शरद पवार गटाचे पॅनेल निष्प्रभ

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा श्री. निलकंठेश्वर पॅनेल व चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनेल यांच्यातच खरी लढत होत असल्याचे निकालावरून दिसून आले. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाने बळीराजा सहकार बचाव पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. परंतु हा पॅनेल निवडणुकीत कसलाही करिश्मा दाखवू शकलेला नाही. याशिवाय शेतकरी कष्टकरी समितीलाही फारशी चमक दाखवता आलेली नाही. मुख्य दोन्ही पॅनेलची धाकधूक मात्र या दोन पॅनेलने वाढवल्याचे दिसून आले.

मतमोजणीवेळी सुसंस्कृत राजकारणाची झलक

माळेगावसाठी मतमोजणी सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री. निलकंठेश्वर पॅनेलचे प्रचार प्रमुख व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष केशवराव जगताप व सहकार बचाव पॅनेलचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांची मतदान केंद्राबाहेर भेट झाली. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकत सुसंस्कृत राजकारणाची झलक दाखवून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news