

Manikrao Kokate Rummy Video
विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत कामकाज सुरू असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला. दरम्यान, कोकाटेंच्या या व्हिडिओची चौकशी सुरु झाली आहे. हा व्हिडिओ कोणी चित्रीकरण केला, याची चौकशी केली जात आहे. विधिमंडळ सचिवालयाने याबाबतची चौकशी सुरू केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यानच्या, कोकाटेंच्या व्हिडिओच्या चौकशीवरुन आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत X वर पोस्ट केली आहे. ''पतीच्या खुन्यांना गजाआड करण्यासाठी एक ज्ञानेश्वरी मुंडे ही भगिनी २ वर्षे आक्रोश करतेय तरी तिची दखल घेतली जात नाही. हायकोर्टाने सांगूनही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुन्यांवर गुन्हा दाखल होत नाही, संतोष देशमुख प्रकरणातही झालेली दिरंगाई सर्वांनी पाहिली. पण विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या मंत्र्याचा व्हिडिओ कुणी काढला? याची मात्र सरकार चित्त्याच्या वेगाने चौकशी करतंय,'' असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
वास्तविक रमी खेळणाऱ्या मंत्र्याचं पितळ उघड करणारा विधिमंडळात बसलेला असो की गॅलरीत हे महत्त्वाचं नाही. तर त्याने मंत्र्यांचा कारनामा जगापुढं आणला हे महत्त्वाचं आहे. उद्या व्हिडिओ काढणारी व्यक्ती पुढं आली तर राज्यातील ४ कोटी शेतकऱ्यांसह महाराष्ट्र त्याचा सत्कारच करेल.
विरोधी पक्षाने आवाज उठवल्यानंतर सरकार विधिमंडळात चौकशीची घोषणा करतं. पण त्याचं पुढं काहीच होत नाही. आम्ही मांडलेल्या सामान्य माणसांच्या ज्वलंत विषयांकडं दुर्लक्ष केलं जातं, पण राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी मात्र पदाचा कशा पद्धतीने गैरवापर होतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही चौकशी आहे. पण सामन्य माणूस आणि शेतकरी विरोधी असलेल्या या सरकारला आम्ही कायम उघडं पाडत राहू!, असा सूचक इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
दरम्यान, कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्री पद काढून मकरंद पाटील यांच्याकडे दिले जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तर मकरंद पाटील यांच्याकडील मदत आणि पुनर्वसन खाते माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे समजते.