

नवी मुंबई: ऐरोली सेक्टर ५ येथील भूखंड क्रमांक ३७ वर नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नाटयगृह बांधण्यात येत आहे. नाटयगृहांचे काम ९० टक्के झाले आहे.
२६ पर्यत या नाटयगृहांचे काम पूर्ण होणार असल्याचा विश्वास शहर अंभियता शिरीष आरदवाड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा नाट्यगृहाचा पडदा लवकर उघडण्याची शक्यता बळावली असल्याने १२ वर्षानंतर नाट्यरसिकांची प्रतीक्षा संपणार आहे.
या नाटयगृहाचे भमिपूजन होऊन जवळपास बारा वर्षाचा काळ लोटला आहे. या नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात असताना त्याला आग लागण्याची घटना घडली होती. पण आता या रखडलेल्या कामाला गती मिळाली असून ऐरोली नाटयगृहाचे काम अंतिम टप्प्यांत आहे.
नवी मुंबई परिसराचा विकास करताना सिडकोमार्फत सुरूवातीला वाशी, बेलापूर, नेरुळ, तुर्भे हे नोड विकसित करण्यात आले. त्यामुळे नागरी सोयी सुविधा पुरविताना नागरिकांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली.
त्यानंतर नवी मुंबईचा दिघ्यापर्यंत झालेला विस्तार व नवी मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराच्या कोपरखैरणेपासून तिकडच्या भागातील नागरिकांसाठी मनोरंजनासाठी हक्काचे ठिकाण असावे अशा प्रकारची मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींकडून होत होती.
दरम्यान, मनोरंजन केंद्राची अपेक्षा लक्षात घेऊन विधानसभा व पालिका निवडणुका सन २०१४ च्या लक्षात घेऊन २४ जुलै २०१३ रोजी महानगरपालिका सर्वसाधारण सभेने प्रशासकीय मंजुरी दिली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया पार पाडून मे. महाविर रोड्स अॅड इन्फा. प्रा. लि. यांना २० ऑगस्ट २०१४ रोजी कंत्राट देण्यात आले.
त्यावेळी ५४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. पण ठेकेदाराने आर्थिक विवेचनांचे कारण देत काम केले नाही. जवळपास सहा वर्षे या नाटयगृहाचे काम रखडले होते. पण तत्कालीन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या नाट्यगृहाचे नव्याने निविदा प्रक्रिया करुन काम मार्गी लावले आहे.
या नाट्यगृहाचे काम जुलै २०२१ मध्ये सुपर कंस्ट्रक्शनला देण्यात आले होते. दरम्यान, नाट्यगृहासाठी ७० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. ऐरोली नाटयगृह झाल्यांनतर दिघा, ऐरोली, घणसोली मधील नाटयरसिकांची होणारी फरफट थांबणार आहे.
नाट्यगृहाची रचना
१ ले तळघर - कार पार्किग
२ रे तळघर -कार पार्किग
तळमजला - तिकीट घर, प्रसाधन गृह, रंगीत तालीम कक्ष, मुख्य प्रवेशद्वार
पहिला मजला - सौंदर्य प्रधानगृह, प्रसाधनगृह अपंगाकरीता, उपहारगृह
दुसरा मजला - ग्रीन रुम, प्रशासकीय दालन, बहुउद्देशीय सभागृह
तिसरा मजला आधिकारी कक्ष, अतिथीगृह, उपहारगृह
चौथा मजला अतिथीगृह, आधिकारी कक्ष
ऑर्केस्टा आसनव्यवस्था ४७४
दिव्यांगाची आसनव्यवस्था ४
बाल्कनी आसनव्यवस्था ३८२
एकूण ८६०
ऐरोली नाटयगृहाचे काम हे जलदगतीने सुरु असून सन २०२६ च्या अखेरपर्यंत हे काम होईल. हे नाट्यगृह सर्व सुविधांनीयुक्त असणार आहे. नूतन वर्षात ऐरोलीमधील नाट्यरसिकांची प्रतीक्षा संपणार आहे.
-शिरीष आरदवाड, शहर अंभियता नमुंमपा.