

डोंबिवली: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी कल्याण-डोंबिवली परिसरातील १० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांविरोधात पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.
कारवाईदरम्यान काही मंडळांच्या डीजेची ध्वनीपातळी ८३ ते तब्बल १०५ डेसिबलपर्यंत नोंदविण्यात आली आहे. याचबरोबर विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक रस्त्यावर फटाके फोडल्याप्रकरणी सात जणांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या ध्वनीमर्यादेबाबतच्या निर्देशांची तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी डीजे वापराबाबत जारी केलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी मिरवणुकांवर लक्ष ठेवले होते. यावेळी ध्वनीपातळीची तपासणी करून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळलेल्या मंडळांवर कारवाई करण्यात आली.
कल्याणमध्ये बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या मिरवणुकीतील डीजेची ध्वनीपातळी १०१ डेसिबल नोंदविण्यात आली. याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष प्रणव नायडू आणि डीजे चालक विजय मलबारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
खडकपाडा पोलिसांनी शिवांजली मित्र मंडळ आणि जय गणेश मित्र मंडळाविरोधात कारवाई केली. शिवांजली मित्र मंडळाच्या डीजेची ध्वनीपातळी ९१ डेसिबल, तर जय गणेश मित्र मंडळाच्या डीजेची ८३ डेसिबल नोंद झाली.
महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोशीबागेचा राजा, जरी मंडळ आणि बाल गोपाळ मित्र मंडळाविरोधात कारवाई करण्यात आली. जोशी बागेचा राजा मंडळाच्या डीजेची ध्वनीपातळी ९१ डेसिबल, तर बाल गोपाळ मित्र मंडळाच्या डीजेची १०० डेसिबल नोंदविण्यात आली.
डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार मंडळांवर कारवाई करण्यात आली. आनंदनगर मित्र मंडळाच्या डीजेची ध्वनीपातळी १०३ डेसिबल, साईनाथ मित्र मंडळाची १०५ डेसिबल, गणेश मित्र मंडळाची ९३ डेसिबल तर शिवसमर्थ मंडळाच्या डीजेची ९६ डेसिबल नोंद झाली. या चारही प्रकरणात संबंधित पदाधिकारी आणि डीजे चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.