

पुढारी ऑनलाईन डेस्क : अहिल्यादेवींचे थेट वंशज माजी मंत्री राम शिंदे आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना चाैंडी येथे जाण्यापासून रोखण्यात आले. हा प्रकार चुकीचा असून ,पक्षाच्या पलिकडे जाऊन अहिल्यादेवींची पुण्यतिथी साजरी व्हायला हवी, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. ३१) भव्य सोहळा आयोजित केला आहे. दरम्यान, आ. गोपीचंद पडळकर यांना चौंडीमध्ये येण्यास पोलीस प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आला. त्यांना कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे अडविण्यात आले.
चौंडीचे प्रशासन प्रस्थापित पवार घराण्याच्या दबावाखाली असल्यामुळे आमच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी देत नाही, असा आरोप करत याप्रकरणी आ. पडळकर यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस आधीक्षक यांच्याकडे तक्रार केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडी (ता. जामखेड) येथे साजरी करण्यात येत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही आज चौंडीत होणार आहे.
कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेते आणि मान्यवरांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, हा जयंती सोहळा नसून राष्ट्रवादीचा मेळावा आहे, अशी टीका भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे.
हेही वाचलंत का ?