

मुंबई : राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेचे अचूक भौगोलिक स्थान (अक्षांश-रेखांश) आता शासनाकडे उपलब्ध होणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या ‘युडायस प्लस जीआयएस कॅप्चर’ मोबाईल ॲपद्वारे शाळांच्या ठिकाणांची नोंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
‘युडायस प्लस जीआयएस कॅप्चर’ ॲपद्वारे संकलित करण्यात येणारी माहिती केंद्र, राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर शालेय शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापरण्यात येणार आहे. यातून नियोजन, शैक्षणिक संसाधनांचे वाटप, धोरणात्मक निर्णय तसेच ग्राफिकल विश्लेषण अधिक अचूक पद्धतीने करता येणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्त तसेच जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. शाळा नेमकी कुठे आहे, तिचे स्थान नकाशावर अचूक कुठे येते, याची खात्रीशीर माहिती मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सूचना केंद्र यांच्या साहाय्याने हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून, ते ॲण्ड्रॉइड तसेच आयओएस प्रणाली असलेल्या मोबाईलसाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
राज्यातील सर्व शाळांना हे ॲप वापरणे बंधनकारक राहणार आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या मोबाईलमध्ये संबंधित ॲप डाउनलोड करून, युडायस प्लसचा लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करावे आणि शाळेच्या ठिकाणाची माहिती स्वतः उपस्थित राहून अचूक नोंदवावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील शाळांची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर
जिल्ह्यातील एकही शाळा या प्रक्रियेबाहेर राहू नये, याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर देण्यात आली आहे. शाळांच्या अचूक भौगोलिक माहितीतून भविष्यात शाळा एकत्रीकरण, नवीन शाळा मंजुरी, शिक्षक नियुक्ती, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या संख्येचे विश्लेषण यांसारख्या निर्णयांना ठोस आधार मिळणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.