

भारतविरोधी नेता शरीफ ओसमान हादी याच्या हत्येनंतर बांगलादेशात हिंदू समुदायावर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Bangladesh violence against Hindus
ढाका : बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणारे हल्ला सत्र सूरुच आहे. गेल्या दोन आठवड्यांत हिंदू तरुणांवर झालेला चौथा हल्ल्याची घटना घडली आहे. केउरभांगा बाजार येथील औषध दुकानदाराला जिंवत जाळण्याचा धक्कादायक प्रकार थर्टी फर्स्टच्या रात्री (३१ डिसेंबर) घडला. आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या तरुणाने यांनी जवळच असलेल्या तलावात उडी मारल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला. या धक्कादायक घटनेनंतर हिंदू समुदायामध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण परसले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोकन चंद्र हा तरुण थर्टी फर्स्टच्या रात्री (३१ डिसेंबर) केउरभांगा बाजार येथील आपले औषधांचे दुकान बंद करून घरी परतत होता. रात्री ९ च्या सुमारास तिलोई परिसरात दबा धरून बसलेल्या गुंडांनी त्यांना रस्त्यात अडवले. जमावाने प्रथम त्यांना बेदम मारहाण केली. धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केला. एवढ्यावरच न थांबता नराधमांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले.
गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या खोकन यांनी प्रसंगावधान राखत जवळच्या तलावात उडी घेतली. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने शरीयतपूर सदर रुग्णालयात दाखल केले. खोकन यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
भारतविरोधी तरुण नेता शरीफ ओसमान हादी याच्या हत्येनंतर बांगलादेशात हिंदू समुदायावर हल्ले आणि मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हादीच्या मारेकऱ्यांनी भारतात आश्रय घेतल्याच्या अफवेमुळे या आंदोलनाला भारतविरोधी वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर खोकन यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे हिंदू समुदायामध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे.
खोकन यांच्यावरील हल्ल्याच्या आदल्याच दिवशी, म्हणजेच सोमवारी, मयमनसिंग येथे बजेंद्र बिस्वास या हिंदू सुरक्षा रक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गारमेंट फॅक्टरीत कर्तव्यावर असताना नोमान मिया नावाच्या व्यक्तीने 'तुला गोळी मारू का?' असे विचारत बिस्वास यांच्यावर गोळी झाडली होती. बिस्वास आणि मिया हे दोघेही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'अन्सार वाहिनी'चे सदस्य होते.