मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे १४.८२ कोटी थकवले | पुढारी

मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे १४.८२ कोटी थकवले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा

क्रिकेट सामन्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेच्या मोबदल्यात मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून १४.८२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात मुंबई पोलिस अपयशी ठरले आहेत. क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना ३६ स्मरणपत्रे पाठवूनही त्यांनी मुंबई पोलिसांनी दाद दिलेली नाही.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन यांना विविध क्रिकेट सामन्यांसाठी दिलेली सुरक्षा आणि त्यासाठी लागणा-या सुरक्षा शुल्काची माहिती मिळण्याबाबत मुंबई पोलिसांकडे माहिती अधिकारात अर्ज केला होता. पोलिस खात्याने गेल्या आठ वर्षातील विविध क्रिकेट सामन्याबद्दल माहिती दिली.

या सामन्यांमध्ये २०१३ साली मध्ये संपन्न झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, २०१६ चा विश्वचषक टी -२०, २०१६ मधील कसोटी सामने, २०१७ आणि वर्ष २०१८ मधील आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे.

या सामन्यांना पुरवल्या गेलेल्या सुरक्षेपोटी १४ कोटी ८२ लाख ७४ हजार १७७ रुपये शुल्क मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप पोलीस खात्याला दिलेले नाही. असोसिएशनने गेल्या आठ वर्षात केवळ २०१८ सालच्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले १.४० कोटीचे शुल्क अदा केले आहे. थकबाकी मिळावी म्हणूम मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना ३६ स्मरणपत्रे पाठवली आहेत. थकबाकीच्या रक्कमेवर ९.५ टक्के व्याज आकारले जाणार आहे.

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यासाठी पुरवलेल्या सुरक्षेचे शुल्क अद्याप आकारलेले गेले नाही. किती शुल्क आकारले जावे यासाठी राज्य सरकारने निर्देश दिलेले नाहीत. पोलिस खात्याने याबाबत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना नऊ वेळा पत्रव्यवहार केला आहे पण तेथून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

थकबाकी न भरल्याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनवर एफआयआर नोंदवावा आणि शुल्क वसुलीसाठी जिल्हाधिकार्‍यामार्फत कार्यवाही करत असोसिएशनची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी गलगली यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे .

Back to top button