राज्यात लॉकडाऊनबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता? निर्बंध लावण्याबाबत निर्णय आज मंत्रालयात | पुढारी

राज्यात लॉकडाऊनबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता? निर्बंध लावण्याबाबत निर्णय आज मंत्रालयात

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : ज्या जिल्ह्यात उपलब्ध बेडपैकी 40 टक्के बेड कोरोना रुग्णांनी भरतील तेथे लॉकडाऊन लावण्याचा विचार केला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, राज्यात निर्बंध लावण्याबाबत उद्या, बुधवारी होणार्‍या महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

15 दिवसांत राज्यात कोरोना रुग्ण पाच पट वाढले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात निर्बंध लावायचे की नाहीत, याचा निर्णय घेण्यासाठी उद्या मंत्रालयात कोव्हिड कृती दल (टास्क फोर्स) आणि राज्याच्या प्रमुख अधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे दिली.

राज्यातील रुग्णसंख्या वाढत चालली असली, तरी सध्या एकूण रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण हे केवळ चार जिल्ह्यांतील असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी असेल तेथे लॉकडाऊनचा विषयच येणार नाही. रुग्णालयांतील एकूण बेडपैकी 40 टक्के बेड भरले, तर त्या जिल्ह्यात लॉकडाऊन लावला जाईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शाळा सुरू ठेवायच्या की नाहीत, यावर विचारविमर्श सुरू आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंशी चर्चा केली आहे. त्यानुसार महाविद्यालयांबाबतचाही निर्णय बुधवारी अपेक्षित आहे. काही काळासाठी महाविद्यालये ऑनलाईन सुरू ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

तिसर्‍या लाटेत 80 लाख लोकांना संसर्गाची शक्यता

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पहिल्या लाटेत 20 लाख, दुसर्‍या लाटेत 40 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग राज्यात झाला होता. तज्ज्ञांच्या मते, तिसर्‍या लाटेत 80 लाख लोकांना संसर्ग होण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.

Back to top button